मराठा समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी संघटीत होणे काळाची गरज
नाम.संतोष लाड. निपाणी समाजाचा चिंतन मेळावा
निपाणी,ता.27(प्रतिनिधी)-
कर्नाटक राज्यात 25 लाख मराठा समाजबांधव असून हा समाज अर्थिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मागासलेला आहे.त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी संघटीत होणे काळाची गरज असल्याचे मत कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री व मराठा समाजाचे नेते संतोष लाड यांनी व्यक्त केले.येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे शनिवारी 27 रोजी सायंकाळी निपाणी तालुका मराठा समाजाच्यावतीने आयोजित चिंतन मेळाव्या ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी मंत्री श्रीमंत पाटील होते.तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य मराठा निगमं मंडळाचे अध्यक्ष जी.एच.मरियोंजीराव हे होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.स्वागत निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनी केले.तर प्रास्ताविक प्रा.बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केले.

नाम.लाड पुढे म्हणाले, हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ जयजयकार करून चालणार नाही.आपल्या समाजाची मुले शिवजयंतीत डीजे लावून डान्स करतात मात्र शिक्षणात मागे राहतात.हे चित्र बदलण्यासाठी शिवरायांचे विचार अमलात आणणे गरजेचे आहे.राज्यात कोणतेही सरकार असो, मराठा समाज बांधवांनी एकजूट दाखवल्यास राजकीय पक्ष तुमच्या पाठीमागे आपोआपच येतील. आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे.प्रत्येकाने समाजातील सर्व त्या घटकांचा शोध घेऊन विविध योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे.तरच आपल्या समाजाची प्रगती होणार आहे.चिकोडी भागात मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मराठा समाजाची संस्था स्थापन करणार असून या संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला सर्वच बाबतीत प्रशिक्षित करून न्याय दिला जाईल.
माजी मंत्री श्रीमंत पाटील म्हणाले, राज्यात मराठा समाजाची अवस्था अतिशय वाईट असून हा समाज बॅकफुटवर चालला आहे.आपल्यातील चुकामुळे हे घडत असून या चुका सुधारल्यास आपल्या समाजाची प्रगती शक्य आहे. शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे नव्हे तर देशाचे राजे होते. ते मुस्लिम विरोधी अजिबात नव्हते.
राज्य मराठा निगम मंडळाचे अध्यक्ष जी.एच मरीयोजीराव म्हणाले, निगम मंडळाच्या माध्यमातून राज्यात योजना व सवलती अमलात आणून याचा लाभ मराठी समाज बांधवाना मिळवून दिला जाईल.
राज्य महिला काँग्रेसच्या सरचिटणीस व केपीसीसी सदस्या सुप्रिया पाटील म्हणाल्या, समाजाच्या विकासासाठी या पुढील काळात एक मराठा लाख मराठा या संकल्पनेतून एकमेकांच्या हातात हात घालून आपण सर्वांनी काम केले पाहिजे.आपले वडील दिवंगत काकासाहेब पाटील यांनी कोणत्याही समाजावर अन्याय केला नाही.आमचे नेते कामगार मंत्री संतोष लाड यांनी यापुढील काळात राजकीय सामाजिक समिती स्थापन करून समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा असे सांगितले.यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले.सूत्रसंचालन गोपाळ नाईक तर आभार आवळेकर यांनी मांनले यावेळी मराठा समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या काळात रोजगार मेळावा घेणार
दिवंगत माजी आम.काकासाहेब पाटील हे मराठा समाजाचे धुरंदर नेते होते.त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे.त्यांचे कार्य जिवंत ठेवण्यासाठी या भागातील बेरोजगारासाठी लवकरच निपाणीत रोजगार मेळावा घेणार असल्यास नाम.लाड यांनी सांगितले.
सुजय भाऊ तर सुप्रिया बहीणीप्रमाणे
काकासाहेब पाटील यांचे आणि आपल्या घराण्याचे मोठे घनिष्ठ संबंध होते.त्यांच्या हयातीनंतर या कुटुंबाची सर्व ती जबाबदारी आपली असून त्यांचे सुपुत्र सुजय हे माझे भाऊ तर त्यांची मुलगी सुप्रिया ही माझी बहीण असून यापुढील काळात त्यांच्या पाठीशी आपले पाठबळ कायमपणे राहील.


