पुरुषोत्तम महाकरंडकाच्या रंगमंचावर कोल्हापूरची यशपरंपरा कायम
महाअंतिम फेरीत ‘ग्वाही’ या एकांकिकेची बाजी, गत वर्षीच्या यशाची पुनरावृत्ती
कोल्हापूर (प्रतिनिधी) पुणे येथे महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरुषोत्तम महाकरंडक एकांकिका स्पर्धेतील महाअंतिम फेरीत कौन्सिल ऑफ एज्युकेशन, कोल्हापूर संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या “ग्वाही” या एकांकिकेने सांघिक द्वितीय क्रमांक पटकवला.
प्रभावी अभिनय, आशयघन मांडणी आणि सुसंगत नाट्यशैली यामुळे ‘ग्वाही’ या एकांकिकेने परीक्षकांबरोबरच रसिकांचीही मने जिंकली. या यशाबरोबरच वैयक्तिक पारितोषिकांमध्येही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक गुणवत्ता अधोरेखित केली. पार्थ पराग पाटणे यांना उत्कृष्ट अभिनेता, अक्षता बारटक्के यांना उत्कृष्ट अभिनेत्री तर अभिषेक महांतेष हिरेमठस्वामी यांना सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य हा पुरस्कार प्राप्त झाला.
गेल्या वर्षीही कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत घवघवीत कामगिरी केली होती. २०२४ मध्ये कोल्हापूरचा ‘आव्वाज’ थेट महाअंतिम फेरीत घुमला होता. देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ‘यात्रा’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावत पुरुषोत्तम करंडकावर कोल्हापूरचे नाव कोरले, तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका म्हणून ओळखला जाणारा ‘कुमार जोशी करंडक’ शहाजी लॉ कॉलेजने सादर केलेल्या ‘कलम ३७५’ या एकांकिकेने पटकावला होता.
सलग दुसऱ्या वर्षी महाअंतिम फेरीत मिळालेल्या या यशामुळे कोल्हापूरची रंगभूमीवरील परंपरा अधिक भक्कम झाली. या यशामागे कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा मा. सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक अॅड. वैभव पेडणेकर व अॅड. अमित बाडकर यांचे प्रेरणादायी नेतृत्व मोलाचे ठरले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी आणि प्रा. प्रवीण सोरटे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध तयारी व कलात्मक दृष्टी विद्यार्थ्यांच्या यशामागे महत्त्वाची ठरली.
सांस्कृतिक मूल्ये, सामाजिक भान आणि आधुनिक नाट्यशैली यांचा समतोल साधत साकारलेली ‘ग्वाही’ ही एकांकिका आणि त्याआधीचे ‘यात्रा’ व ‘कलम ३७५’ सारखे प्रयोग, यामुळे देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स व शहाजी लॉ कॉलेज यांच्या सांस्कृतिक विभागांची ओळख राज्यस्तरावर अधिक दृढ झाली आहे. महाविद्यालयीन रंगभूमीवरून राष्ट्रीय स्तराकडे वाटचाल करणारी ही यशपरंपरा भावी कलाकारांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.


