शाश्वत विकाससाठी मानवी हक्क आवश्यक – माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील

0
शाश्वत विकाससाठी मानवी हक्क आवश्यक माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील

ज्येष्ठ विचारवंत व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील सोबत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार रं. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर, (प्रतिनिधी) :शाश्वत विकास साध्य करायचा असेल तर मानवी हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन अत्यावश्यक आहे. केवळ आर्थिक वाढ म्हणजे विकास नव्हे, तर माणसाची प्रतिष्ठा, स्वतंत्र विचार आणि समानतेला केंद्रस्थानी ठेवणारा विकासच खऱ्या अर्थाने शाश्वत ठरतो.” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले.

       ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने विद्यापीठाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ‘क्रांतिवीर रंगरावदादा पाटील’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. “मानवी हक्क आणि जागतिक वास्तव या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून त्यांनी आठवे पुष्प गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार रं. पाटील होते. यावेळी विद्यापीठाचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, अॅड. प्रकाश हिलगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

      न्यायमूर्ती कोळसे-पाटील पुढे म्हणाले की, आजच्या जागतिक परिस्थितीत मानवी हक्कांवर विविध प्रकारची संकटे निर्माण होत आहेत. युद्ध, दहशतवाद, आर्थिक विषमता, जाती-धर्माच्या आधारावर होणारे भेदभाव आणि लोकशाही मूल्यांचा होत असलेला न्हास हे मानवी हक्कांसमोरील गंभीर आव्हाने आहेत. केवळ कायदे करून मानवी हक्क सुरक्षित होत नाहीत, तर समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्द रचनेने भारतीय राज्यघटनेची सुरुवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने भारत देशामध्ये मानवी हक्कांची सुरुवात केली. क्रांतीवीर रंगरावदादा पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व सामाजिक जीवनातील कार्याचा गौरव केला. समाजात परिवर्तन घडविण्यासाठी त्यांच्या व डॉ व्ही. टी. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

          कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेतोल विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र प्रदान करत सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन एस. डी. चव्हाण तर आभार प्रदर्शन पी जार. मंडलिक यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे विश्वस्त तसेच प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, आचार्य राजनंदा देशमुख, मुख्याधापिका श्रीमती शोभा चौधरी, श्रीमती नूतन आतराम यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *