नाइट कॉलेज मध्ये ‘इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स एंड करिअर ऑपोर्चुनिटीज़’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न
कार्यशाळेच्या नियोजनामध्ये कार्यशाळेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. उत्तम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर, (प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत नाइट कॉलेज कोल्हापूर येथील इंग्रजी विभागामार्फत ‘इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स एंड करिअर ऑपोर्चुनिटीज़’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजीचे महत्व, प्रभावी संवाद कौशल्ये व करिअरच्या संधी यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव मा. डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले. त्यांनी याप्रसंगी कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी इंग्रजी भाषेवर किमान प्रभुत्व असण्याचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेची बीजभाषक प्राचार्य डॉ नागेश नलवडे यांनी श्रवण, भाषण, वाचन व लेखन या भाषिक कौशल्यांवर प्रभुत्व कसे मिळवावे हे विविध उदाहरणाद्वारे सांगितले. तसेच इंग्रजी संभाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी अवांतर इंग्रजी वाचन, बोलण्याचा सराव, आत्मविश्वास व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रथम सत्रामधे पौर्णिमा पाटील यांनी ‘व्हाय युवर डिग्री इझंट इनफ विदाउट इंग्लिश’ या विषयावर संवाद साधला. या सत्रामध्ये त्यांनी करिअरसाठी इंग्रजी भाषा किती आवश्यक आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या सत्राचा अध्यक्षपदी प्रा. डॉ. कल्पना गंगातीरकर उपस्थित होत्या. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा.डॉ. सबीहा फरास यांनी ‘टर्निंग ब्रोकन इंग्लिश इंटू करियर इंग्लिश या विषयावर सखोल चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजीतील भीती दूर करून आत्मविश्वास कसा वाळवावा याबाबत मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. नामदेव जाधव यांनी ही आपले विचार मांडले.
कार्यशाळेसाठी न्यू कॉलेज क्लस्टर अंतर्गत विविध महाविद्यालयातील १७९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेच्या नियोजनामध्ये कार्यशाळेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. उत्तम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे लीड कॉलेज समन्वयक डॉ. सुनील सूर्यवंशी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. एमन अत्तार समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. विभागातील प्राध्यापक, अभ्यासक व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. कार्यशाळेमध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


