अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल व कमला कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करत राहण्याचा संकल्प
कोल्हापूर.(प्रतिनिधी) ताराराणी विद्यापीठ संचलित कमला कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त) आणि अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनावेळी कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, अथायु हॉस्पिटलचे अधिकारी डॉ. अश्विनी कडलगे तसेच विविध शाखांचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. शिबिरामध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनीसाठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये जनरल सर्जरी मार्गदर्शन, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी तपासणी, दंत तपासणी, स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला तसेच इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या उपक्रमाचे आयोजन सामाजिक आरोग्य आणि सामाजिक समस्या जनजागृती विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. विश्वनाथ तराळ, प्रा. डॉ. सागर वाळवेकर आणि प्रा. डॉ. पूजा पाटील यांनी केले. आरोग्य तपासणी शिबिराला विद्यार्थिनींचा आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या डॉ. मुडेकर यांनी अथायु हॉस्पिटलचे सर्व डॉक्टरांचे आभार मानून भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.



