कमला कॉलेज मध्ये कॉमर्स फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेचा जागर

0
1000217530

जागर व्यापार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) कमला कॉलेज वाणिज्य विभागातर्फे कॉमर्स फोरम अंतर्गत व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योगशीलता, व्यावहारिक ज्ञान, व्यवस्थापन कौशल्य तसेच उद्योजकत्वाची भावना विकसित करणे या उद्दिष्टाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक अनुभव मिळवण्याची अनमोल संधी उपलब्ध झाली.

       मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. उद्घाटन सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध स्टॉल्सना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व प्रमाणात उपस्थिती लावली.

     या प्रसंगी वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. सागर वाळवेकर, सहा. प्रा. निलेश क्षीरसागर, डॉ. पूजा दुधगावकर, सहा. प्रा. मयुरी वाघमारे, सहा. प्रा. हेमलता मिणचेकर आणि सहा. प्रा. क्रांती संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत  कार्यक्रम पार पडला. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन दिले आणि त्यांचे कौतुक केले.

   व्यापार मेळाव्यामध्ये विद्यार्थी गटांनी अत्यंत नाविन्यपूर्ण, सर्जनशील, व्यावसायिक संकल्पना मांडत विविध प्रकारचे स्टॉल्स उभारले होते. यामध्ये खास खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हस्तनिर्मित उत्पादने, शिक्षणसाहित्य. घरसजावटीच्या वस्तू, तसेच आधुनिक डिजिटल सेवांचे स्टॉल्स होते. प्रत्येक स्टॉलमधून विद्यार्थ्यांच्या सर्जनशील, कल्पनाशक्ती, नवनिर्मितीची भावना आणि स्वयंप्रेरित व्यवसायवृत्तीचे दर्शन झाले.

   विद्यार्थ्यांनी केवळ उत्पादनांची विक्री करण्यापुरतेच मर्यादित न राहता, ग्राहकांशी संवाद साधणे, त्यांच्या गरजा समजून घेणे, उत्पादनाची योग्य किंमत ठरवणे, गुणवत्ता नियंत्रण राखणे, स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहणे, विक्री तंत्रे वापरणे तसेच ग्राहक समाधान सुनिश्चित करणे यासारख्या व्यावहारिक पैलूंचाही अनुभव घेतला. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना वास्तविक व्यावसायिक आव्हानांचा सामना कसा करावा हे शिकायला मिळाले.

  यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलवरून स्वतः खरेदी करत त्यांच्या मेहनतीला आणि सर्जनशीलतेला दाद दिली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आणि त्यांना आपल्या क्षमतेची ओळख पटली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *