NCC कॅडेट्सकडून प्रतीभानगर येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता व पुष्पचक्र अर्पण समारंभ
NCC कॅडेट्सकडून प्रतीभानगर येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता व पुष्पचक्र अर्पण समारंभ
कोल्हापूर, (प्रतिनिधी): कोल्हापूर येथील 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन NCC यांच्या वतीने सामाजिक सेवा व समुदाय विकास उपक्रमांतर्गत प्रतीभानगर येथील हुतात्मा स्मारक व स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांची स्वच्छता मोहीम तसेच पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात एकूण 325 NCC कॅडेट्ससह बटालियनचे अधिकारी व प्रशिक्षकवर्ग, स्टाफ, गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर, असोसिएट, ऑफिसर्स, आणि बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलावडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
हुतात्मा स्मारक परिसरातील कचरा हटविणे, पुतळ्यांची साफसफाई करणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अशी विविध कामे या मोहिमेदरम्यान करण्यात आली.
स्वच्छता मोहिमेनंतर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी पुष्पचक्र अर्पण समारंभ पार पडला. यावेळी उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला श्रद्धांजली अर्पण केली.
या उपक्रमातून कॅडेट्समध्ये शिस्त, जबाबदारीची जाणीव, संघभावना, नेतृत्वगुण, सार्वजनिक मालमत्तेचा आदर आणि समाजासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची भावना दृढ झाली. NCC च्या “एकता आणि शिस्त” या ब्रीदवाक्यानुसार युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी व नैतिक मूल्ये रुजवण्याचा हा उपक्रम ठरला.



