शाहू कॉलेज येथे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथे प्रा. डॉ. एन. डी. पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे हे पहिले वर्ष आहे.
महाराष्ट्राचे कृतिशील विचारवंत, कामगार नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे विचार आणि कार्य समाजापर्यंत जावे, ह्या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला विचारपीठ मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कनिष्ठ व वरिष्ठ गटात संपन्न झालेल्या ह्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. ह्या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. जी. पी. माळी यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या स्पर्धेसाठी डॉ. अरुण शिंदे, डॉ. सर्जेराव जाधव, डॉ. चंद्रकांत पोतदार, डॉ. गुंडोपंत पाटील, डॉ. सर्जेराव पद्माकर, डॉ. विनोद कांबळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
ह्या स्पर्धेत डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, बोरपाडळे ची कु. ऋतुजा शिवदास मुंडे हिने वरिष्ठ गटात पहिला क्रमांक तर यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स, सातारा येथील यशराज आप्पा हेगडे ह्या विद्यार्थ्याने कनिष्ठ गटातून प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचे वरिष्ठ गटाचे निकाल तसेच उत्तेजनार्थ निकालही जाहीर करण्यात आले.


