ए. आय. वर्तमानाचा साथीदार – डॉ. एम. व्ही. टाकळे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले होते
कोल्हापूर (प्रतिनिधी) राजर्षी छ. शाहू कॉलेज कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे पदार्थविज्ञान विभागात एक दिवसीय अग्रणी महाविद्यालय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विद्यापीठाचे संशोधक प्राध्यापक डॉ. एम. व्ही. टाकळे उपस्थित होते. कार्यशाळेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेत बोलताना ते म्हणाले, आजच्या घडीला मानवी जीवनातील असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. त्यामुळे आजच्या युगाला ए. आय. चे युग म्हणावे लागते. आपली कोणतीही कामे अधिक गतीने आणि अधिक विश्वासाने पूर्ण करण्यासाठी ए. आय. ची मदत आवश्यक आहे. म्हणूनच आपण ए. आय. कडे वर्तमानाचा साथीदार म्हणून पाहू शकतो. तंत्रज्ञान आधारित जीवन ही आजच्या युगाची ओळख आहे. आपली ही ओळख अधिक गडद करायची असेल तर आपल्या हाती विश्वासू साथीदार असणे आवश्यक आहे. ही विश्वासू साथीदाराची जागा ए. आय. घेत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ए. आय. चे तंत्रज्ञान आत्मसाथ करणे आवश्यक आहे. असे मत शिवाजी विद्यापीठाचे संशोधक प्राध्यापक डॉ. एम. व्ही. टाकळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या ए.आय. कोर्सबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या ए. आय. शिक्षणाचा लाभ घ्यावा. असेही विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यशाळेस तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थशास्त्र विभागाचे डॉ. सत्यजित पाटील, विलिंग्डन महाविद्यालयाच्या पदार्थशास्त्र विभागाचे युगेन कुलकर्णी हे उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी योजनेअंतर्गत अग्रणी महाविद्यालय न्यू कॉलेज यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेस महाविद्यालयाच्या आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. एस. शेळके, डॉ. बी. वाय. सायमोते , डॉ. डी. एस. कुंभार , प्रा. डी. एम. माळवेकर व कोल्हापूर परिसरातील अग्रणी महाविद्यालयातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. ए. आर. पाटील, सूत्रसंचालन कु. भक्ती पाटील तर आभारप्रदर्शन डॉ. टी. एस. कुरणे यांनी केले.


