विकसित भारतासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकतेची गरज – चंद्रशेखर डोली
कोल्हापूर (प्रतिनिधी): विकसित भारतासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकतेची आज खरी गरज असल्याचे प्रतिपादन मयुरा स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष चंद्रशेखर डोली यांनी केले. ते कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित, नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर तर्फे आयोजित कौशल्य विकास आणि उद्योजकताः विकसित भारतामधील युवा सक्षमीकरणाचा मार्ग’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासतत्रात बोलत होते.
चंद्रशेखर डोली म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नाही, तर उद्योजक बनण्यासाठी लागणारी जोखीम घेण्याची वृत्ती तरुणांनी जोपासली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्थानिक संसाधनांचा वापर करून नवनवीन स्टार्ट अप्स सुरू करण्यावर भर द्यावा. यावेळी आर्म मशीन टूल कंपनीचे आर. आर. मुसानी यांनी बीजभाषण करताना तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व विषद करतांना सांगितले की, जागतिक बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेणारे शिक्षणच युवकांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवू शकते.
यावेळी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे म्हणाले की, बँकिंग क्षेत्राचे वेगाने डिजिटलायझेशन होत असून, विद्यार्थ्यांना तांत्रिक साक्षरतेसोबतच ‘सॉफ्ट स्किल्स’ आत्मसात करणे अनिवार्य आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न ठेवता आर्थिक व्यवहार आणि बैंकिंग कार्यप्रणालीचे ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे. या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. एस. महाजन यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगांची गरज यामध्ये सांगड घालण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ राजन पडवळ, डॉ. के. व्ही. मारुलकर, प्रा अभिजीत मिसाळ डी. आर. के. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उत्तम पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या सेमिनार चे समन्वयक प्रा. अभिजित कांबळे आणि प्रा डी. एस. जाधव यांनी प्रयत्न केले. सेमिनार चे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अक्षता गावडे यांनी केले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सेमिनारसाठी परिश्रम घेतले.


