फुटबॉलच्या मैदानातून समाजसेवेपर्यंत ‘रोनाल्डो ग्रुप’चे प्रेरणादायी कार्य

0
1000255081

मनपा.श्रीम.लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर जरगनगर कोल्हापूर

कोल्हापूर. (प्रतिनिधी)  कोल्हापूर शहर हे नेहमीच क्रीडाप्रेमासाठी ओळखले जाते. मात्र येथे काही फुटबॉलप्रेमी युवकांनी खेळाला केवळ मनोरंजनापुरते न ठेवता त्यातून समाजसेवेचा विधायक संदेश देण्याचा आदर्श उपक्रम राबविला आहे. ख्रिस्तीआनो रोनाल्डो या जागतिक कीर्तीच्या फुटबॉलपटूप्रती असलेल्या प्रेमातून ‘ख्रिस्तीआनो रोनाल्डो ग्रुप’ची स्थापना सन 2014 मध्ये करण्यात आली. स्थापनेपासून आजपर्यंत या ग्रुपने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहेत.

                   दरवर्षी ५ फेब्रुवारी रोजी ख्रिस्तीआनो रोनाल्डो यांच्या वाढदिवसानिमित्त हा ग्रुप समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत असून, गेल्या १२ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. यावर्षीही या सामाजिक उपक्रमांचे आयोजन कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, जरग नगर, कोल्हापूर (शाळा क्रमांक ७१) येथे उत्साहात करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रथम केक कापून रोनाल्डोचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

                 या उपक्रमांतर्गत शाळेसाठी उपयुक्त क्रीडा साहित्याचे वितरण, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धा, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये कला व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी वयोगटानुसार चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. तसेच शाळेला आवश्यक असलेले उपयुक्त क्रीडा साहित्य ग्रुपच्या वतीने शाळेला प्रदान करण्यात आले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक सरावासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

         या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता ठोंबरे, श्री. शिवाजी पाटील, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, तसेच रोनाल्डो ग्रुपचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत युवकांनी खेळाच्या माध्यमातून समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले. फुटबॉलप्रती असलेली आवड समाजहितासाठी वापरत खेळ, सेवा आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा सोनाळकर यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *