कमला कॉलेजमध्ये शिवजयंतीनिमित्त लाठी-काठी कार्यशाळा संपन्न
कार्यशाळेस ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले
कोल्हापूर (प्रतिनिधी) ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज , कोल्हापूर (स्वायत्त) येथे अँटी रॅगिंग समिती, अंतर्गत तक्रार निवारण समिती, क्रीडा विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण लाठी-काठी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेस ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख प्रशिक्षक म्हणून शांतीदूत मर्दानी आखाडा, कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज केसरकर उपस्थित होते. श्री केसरकर त्यांच्यासोबत दत्ता जाधव, साक्षी शेळके, अथर्व मुधोळकर यांनी विद्यार्थिनींना लाठी-काठीचे मूलभूत तंत्र, स्वसंरक्षणातील उपयोग व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रभावी प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चिन्मयी सांगळे यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. स्वाती कांबळे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन लेफ्टनंट प्रा. ज्योती लेंगरे यांनी केले.
या कार्यशाळेत विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये धैर्य, शारीरिक सक्षमता व आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मोलाची मदत झाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वसंरक्षणाचा हा संदेश आत्मसात करून सर्वांनी आत्मविश्वास, शौर्य आणि संस्कृतीची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प केला.



