सुविधा देण्याचे सुचविण्यापेक्षा रस्ते, गटारी निर्मितीकरीता आमदार खासदारांनी अनुदान आणणे गरजेचे होतेःविलास गाडीवड्डर
oplus_2
निपाणी,ता.19(प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील निपाणी हे मोठे शहर आहे. गेल्या 15 दिवसांपासून ग्रामदैवत महालक्ष्मी आणि महाशिवरात्री पार पडली. महालक्ष्मी मंदिराची जीर्णोध्दारानंंतरची ही पहिलीच यात्रा होती. मात्र आमदार-खासदारांनी यात्रेत अधिकाऱ्यांच्या बैठका घेत त्यांना सुविधा देण्याचे सुचविण्यापेक्षा रस्ते, गटारी निर्मितीकरीता आमदार खासदार निधीतून अनुदान आणणे गरजेचे होते. यात्रेचा वापर त्यांनी स्वत:च्या सवंग प्रसिध्दीसाठी केल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वत्र त्यांचेच फलक झळकले आहेत. यामध्ये देवी पेक्षा त्यांचेच फोटो मोठे दिसत होते.असा आरोप माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांंनी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले, महालक्ष्मी यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मात्र, या काळात येणाऱ्या भाविकांंना चांगल्या रस्त्यांची सुविधा त्यांना देता आली नाही. या पार्श्वभुमिवर गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे कार्य कौतुकास्पद आहे. गोकाक येथे गेल्या अनेक वर्षानंतर भरलेल्या लक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभुमिवर शहराच्या विकासासाठी त्यांनी तब्बल 40 कोटी रूपयांचा निधी आणून गोकाकचा विकास साधला आहे.निपाणीतील यात्रांकरीता 4 कोटींचा निधी आणला असता तर बरे झाले असते. शहरातील प्रमुख असणाऱ्या अशोक नगर, मंगळवार पेठ ते हरीनगर रस्ता दयनीय बनला आहे.यात्राकाळात शहरातील अर्धा भाग अंधारात होता. याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे.
आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात 2060 घरकुलांना मंजुरी करवून घेतली होती. यावेळी घरकुलांचे काम मार्गी लागावे म्हणून आमदारांना 4 पत्रे लिहीली त्यांनी ती बेदखल केल्याने सर्व नगरसेवक आणि नागरीकांची बैठक घेतली. त्यानंतर शहरातील 31 वार्डांमधील 2407 लाभार्थ्यांची नांवे तयार करण्यात आली. त्यानंतर 2052 लाभार्थ्यांची यादी निवडण्यात आली.तत्कालीन पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी याकामी मोठे सहकार्य करून महत्वाकांक्षी घरकुल योजना मार्गी लावण्याचे काम केले. त्यानुसार 15 मार्च 2018 रोनी योजनेस मंजुरी मिळाली. त्यानंतर 27-12/2018 ला केंद्राची मंजूरी मिळाली. मात्र, त्याचवेळी जोल्ले यांनी सरकारला पत्र लिहून या योजनेस विरोध करून तक्रार नोंदविली. त्यांची तक्रार असूनही योजनेस मंजुरी मिळवून घेतली.
त्यानंतर आपला नगरपालीकेतील कार्यकाल संपला. निवडणूका लागल्यामुळे सदर काम रेंगाळले. त्यानंतर आंदोलन केल्यानंतर आपल्या दबावामुळेच कामास सुरवात करण्यात आली. या योजनेत 2 बीएचके घरकुल देणार असल्याची दिशाभूलही आमदारांकडून करण्यात आली. अजूनही लाभार्थ्यांना घरे मिळालेली नाहीत. त्यांना सदर काम पूर्ण करता आले नाही. गेल्या 8 वर्षेांपासून 1400 लाभार्थ्यांनी प्रत्येकी 61000 रूपये भरले आहेत. त्याचे काय झाले ते सांगावे.
काँग्रेसच्या आधारावर जिल्हा बँकेचे ध्येय गाठणाऱ्या जोल्लेंना काँग्रेसवर टिका करण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या निवडणूकीत काँग्रेसच्या मतदरांनी केलेल्या मतदानानंतरच ते निवडून आले आहेत. काँग्रेस पक्ष भ्रष्ट असेल तर, त्यांनी काँग्रेसच्या जीवावर मिळविलेल्या या पदाचा राजीनामा द्यावा मगच टिका करावी. अंगणवाडी महिलांचे निधीची कमतरता असल्याने पैसे थकीत आहेत. मात्र, आपणासारखा घोटाळा करण्यात आलेला नाही. वास्तविक, काँग्रेस पक्षावर टिका होत असतांना येथील पदाधिकाऱ्यांनी त्याचे उत्तर देणे गरजेचे असतांना ते मूग गिळून गप्प बसले आहेत. जोल्लेंना विकासाठी निधी आणता येत नाही; मात्र, स्वत:चे स्वार्थ साधण्यासाठी काँग्रेस बरोबर साटे-लोटे करता येते अशी टिकाही विलास गाडीवड्डर यांनी केली.
यावेळी बाळासाहेब देसाई-सरकार, डॉ.जसराज गिरे, संभाजी गायकवाडी आदींची उपस्थिती होती.


