व्यवस्थापन कौशल्याने भक्कम स्वराज्य निर्मिती: राजेंद्र घाटगे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले होते.
कोल्हापूर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या मागे त्यांचे अद्वितीय असे व्यवस्थापन कौशल्य होते. तत्कालीन जुलमी राजवटीतून जनतेची सुटका करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी रयतेचं राज्य स्थापन केले. नेतृत्व, संघटन कौशल्य आणि अपूर्व अशी युद्धनीती यामुळे त्यांना हे शक्य झाले. असे मत इतिहास अभ्यासक राजेंद्र घाटगे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथील इतिहास विभाग आणि सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त “छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणात्मक व्यवस्थापन कौशल्य” या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. घाटगे यांनी आपल्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांनी दूरदृष्टीने भविष्याचा विचार करून आखलेल्या विविध योजना, या योजना मागील त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आदी गोष्टींचा समग्र आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ, गडकोट, जलदुर्गांची निर्मिती तसेच आरमार उभारणी, गनिमी काव्याने युद्ध अशा अनेक आपल्या व्यवस्थापन कौशल्याने स्वराज्य निर्मिती केली असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भोसले यांनी केले.
या ऑनलाईन व्याख्यानाला प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. यु. बी. शेळके, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. पी. बी. पिष्टे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या एम. बी. देसाई, कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी उबाळे, डॉ युवराज मिठारी, महाविद्यालयाच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुप्रिया खोले यांनी करून दिला तर डॉ. निलेश वळकुंजे यांनी आभार मानले.


