आजारपणावर मात करत दवाखान्यातच दिला बारावीचा जीवशास्त्राचा पेपर

0
1000290011

शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर, गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार परीक्षा केंद्रप्रमुख के. एन. पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सरूड ता26 (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील चरण येथील रूपाली नामदेव शिसाळ या बारावीच्या विद्यार्थिनीने गंभीर आजारपणावर मात करत चक्क दवाखान्यातूनच जीवशास्त्र विषयाची बोर्ड परीक्षा दिल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे तिचे होणारे शैक्षणिक नुकसान टळले आहे. डोणोली येथील यशवंत अकॅडमीमध्ये इयत्ता बारावीला शिकणाऱ्या रूपालीचा सध्या बारावी बोर्ड परीक्षा सुरू असतानाच जीवशास्त्र विषयाचा महत्त्वाचा पेपर होता. मात्र दोन दिवसांपासून ती आजारी असल्याने तिला बांबवडे येथील जानकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

      प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सरुड येथील परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर देणे तिला शक्य नव्हते. ही बाब लक्षात येताच तिचे वडील नामदेव शिसाळ यांनी सरुड परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख के. एन. पाटील यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. केंद्रप्रमुखांनी तात्काळ गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांच्याशी संपर्क साधून ही बाब कळवली. त्यानंतर शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना याबाबत माहिती देण्यात आली. शिक्षण विभागाने तत्काळ निर्णय घेत दवाखान्यातच परीक्षा घेण्याची परवानगी दिली.

  सर्व नियम व सुरक्षेचे पालन करत सरुड केंद्राचे केंद्रप्रमुख के. एन. पाटील व पर्यवेक्षक उदय पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन अत्यंत सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात रूपालीकडून जीवशास्त्राचा पेपर सोडवून घेतला. शारीरिक आजारपणाशी झुंज देत असतानाही रूपालीने परीक्षा दिली आणि तिचे शैक्षणिक नुकसान टळले. या घटनेमुळे शिक्षण विभागाच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *