तुरुकवाडीचा सुपुत्र हर्षवर्धन पाटील यांचे यूपीएससीमध्ये उज्ज्वल यश
शाहूवाडी तालुक्यासाठी अभिमानाची बाब
सरूड (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी गावचे सुपुत्र हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे शाहूवाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हर्षवर्धन पाटील हे तुरुकवाडी येथील प्राध्यापक डॉ. एच. पी. पाटील यांचे चिरंजीव असून घरातून मिळालेल्या योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या कठीण प्रवासात कुटुंबीयांचा पाठिंबा आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे ते या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले.
शाहूवाडी तालुक्यातून दरवर्षी यूपीएससी व एमपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवण्याची परंपरा आहे. यंदाही हर्षवर्धन पाटील यांनी ही परंपरा कायम ठेवत तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राज्य व देशपातळीवर उजळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार तसेच तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


