प्लास्टिक विहिरीत जीवनशैलीचा अवलंब सर्वांनी करावा – डॉ. विश्वनाथ मगदूम
प्लास्टिक विहिरीत जीवनशैलीचा अवलंब सर्वांनी करावा – डॉ. विश्वनाथ मगदूम
कोल्हापूर ता.7 (प्रतिनिधी): प्लास्टिक विरहित जीवनशैलीमुळे पर्यावरणाचे रक्षण होऊन प्रदूषण कमी होते. कचऱ्याचे प्रमाण कमी होते. प्रसंगी आरोग्य सुधारते. अशा प्रकारच्या चांगल्या सवयीमुळे शाश्वत जीवन जगण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे नैसर्गिक संसाधने जपली जातात. त्यामुळे स्वच्छ व निरोगी भविष्य निर्माण होते. त्यासाठी प्लास्टिक विरहित जीवन शैलीचा प्रचार व प्रसार शासनानेच केवळ करून चालणार नाही. प्लास्टिक विरहित जीवनशैलीचा अवलंब समाजातील सर्वांनी करावा असे प्रतिपादन “सोसायटी इन ट्रांझीशन इंटर डिसिप्लिनरी पाथवेज फॉर सस्टेनेबल फ्युचर्स” या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले.
नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर मधील समाजशास्त्र विभाग व आय. क्यू.ए.सी. सदर परिसंवादाचे आयोजन केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून डी. श्रीकांत यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले विवाह संस्था व कुटुंब संस्था या दोन्ही संस्थांमधील बदलत्या संबंधाविषयीची माहिती सांगून या दोन्ही संस्थावर तंत्रज्ञानाचा कसा परिणाम होत आहे. यावर आपले प्रकट विचार मांडले तसेच डी. श्रीकांत पुढे म्हणाले की, देशभक्त सनाप्पाण्णा कुंभार यांनी सहकारी पंचगंगा सहकार कारखाना, सहकारी सूतगिरणी, सहकारी बैंक, सहकारी पाणीपुरवठा योजना, खेडोपाड्यात वाचनालय चळवळ आणि राजकीय कार्य यांच्या माध्यमातून समाजाचा शाश्वत विकास केल्याचे निदर्शनात येते.
या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये प्राचार्य डॉ. मोहिंदर स्लारीया, प्रा. डॉ. दीप्ती रंजन साहू, यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. तर प्रा. रमेश कांबळे मुंबई, डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवले. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे डॉ. एम. सी. शेव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन ज्ञान संपादन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. संशोधन क्षेत्रात कार्य केल्याने समाजाचा प्रसंगी देशाचा विकास झपाट्याने होतो.
समारोप सत्राच्या अध्यक्षपदावरून बोलताना नाइट कॉलेजचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील म्हणाले की, नाइट कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन ही अभिमानाची बाब आहे. आजच्या सामाजिक स्थितीलाअनुसरून हा परिसंवाद भविष्यातील शाश्वत विकासाला आधारभूत अशी चर्चा घडवून आणतोय. ही चर्चा समाज उपयोगी होईलच अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या परिसंवादामध्ये इराण, सिरीया, आफ्रिका, इसक, बांगलादेश, नायजेरिया, मॉरिशिस व रिपब्लिक ऑफ साऊथ सुदन या देशातून तर पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र आदी राज्यातील संशोधकांनी आपल्या संशोधन पेपरचे सादरीकरण केले. परिसंवादाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. महेंद्रकुमार जाधव यांनी केले तर सह समन्वयक प्रा. डॉ. अक्षता भावडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने आंतरराष्ट्रीय परिसंवादाची सांगता झाली. 00000


