किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार व नियमित व्यायामाची गरज – डॉ विश्वनाथ मगदूम
कौन्सिल ऑफ एज्युकेशन, पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि मगदूम इंडो सर्जरी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय किडनी दिवस कार्यक्रम आयोजित केला होता.
कोल्हापूर (प्रतिनिधी) किडनीचे मानवी शरीरातील महत्त्व व कार्य याविषयी जनजागृती होण्यासाठी आणि किडनीच्या आरोग्याविषयी सजगता निर्माण होण्यासाठी १२ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय किडनी दिवस म्हणून साजरा केला जातो. शरीरातील अशुद्ध घटक शुद्ध करण्याचे कार्य किडनी करते .जोपर्यंत किडनीचे कार्य व्यवस्थित चालू आहे, तोपर्यंत माणसाचे आरोग्य व्यवस्थित राहते .भारतामध्ये किडनीविषयक आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . दर दहा व्यक्ती पैकी एका व्यक्तीस किडनीचा आजार आहे . येत्या काही वर्षात हे प्रमाण दर पाच पैकी एका व्यक्तीस होण्याची शक्यता आहे . म्हणून किडनी आरोग्यविषयक जागृती होण्याची नितांत आवश्यकता आहे.
अतिरिक्त साखर, मीठ, तसेच प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, धूम्रपान, मद्यपान, स्थूलपणा इत्यादी गोष्टींच्या वाढत्या प्रमाणामुळे किडनीचे आजार होतात .किडनीविषयक आजारांचे निदान वेळीच करण्याची गरज असते अन्यथा किडनी निकामी होण्याचा धोका असतो व त्यामुळे मानवी जीवन जीवितास गंभीर धोका उद्भवू शकतो. ताजी फळे, पालेभाज्या, संतुलित आहार, नियमित व्यायाम, नियमित शारीरिक तपासण्या इत्यादी गोष्टींकडे लक्ष दिल्यास आरोग्य चांगले राहते . प्रत्येकाने आपल्या बॉडी मास इंडेक्सकडे लक्ष दिले पाहिजे . आपला बॉडी मास इंडेक्स18.5 ते 24.9 च्या दरम्यान असावा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य हाच सुखी जीवनाचा पाया आहे, असे मत कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव व प्रख्यात मूत्ररोगतज्ज्ञ डॉ .विश्वनाथ मगदूम यांनी व्यक्त केले .
कौन्सिल ऑफ एज्युकेशन, पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि मगदूम इंडो सर्जरी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय किडनी दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉ विश्वनाथ मगदूम यांनी ‘निरोगी किडनीसाठी योग्य जीवनशैली आणि काळजी ‘ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले . तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
‘सर्वांसाठी मूत्रपिंडाचे आरोग्य व पर्यावरण संरक्षण ‘ हे सूत्र घेऊन यावर्षी जागतिक किडनी दिवस साजरा करण्यात आला .यानिमित्ताने पार्वती कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली व किडनीच्या आरोग्याविषयी प्रबोधन केले.याप्रसंगी डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्य डॉ वर्षा मैंदर्गी, नाइट कॉलेजचे प्राचार्य डॉ उत्तम पाटील, नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य चिदानंद पाटील यांनी प्रास्ताविक केले . विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले .यावेळी विद्यार्थी व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



