बदलत्या काळात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची – डॉ. संभाजी शिंदे
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी आर. भोसले होते.
कोल्हापूर (प्रतिनिधी) बदलत्या काळाबरोबर अनेक नवी आव्हाने आपल्यासमोर उभी राहताहेत. माणूस म्हणून आपल्याला रोज नव्या गोष्टीना तोंड द्यावे लागते आहे. नवीन शैक्षणिक धोरण, ए. आय. ह्या संकल्पनांनी आपला भवताल व्यापला आहे. काळ कितीही बदलला तरी शिक्षकासाठी अद्याप तरी कोणताही सक्षम पर्याय उभा राहिलेला नाही. उलट उतरोत्तर शिक्षकाची आवश्यकता आणि भूमिका महत्त्वाची ठरू लागली आहे. त्यामुळे हा बदलता काळ, त्याची आव्हाने या सर्वामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाचे डॉ. संभाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर येथील गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव समारंभात बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे गुणवंत विद्यार्थी तसेच ग्रंथलेखन, संशोधन, पेटंटप्राप्त शिक्षक यांचा गुणगौरव करण्यात आला. ह्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी आर. भोसले होते.
डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, स्वत:ला ओळखायला शिका, बदलत्या काळाला सामोरे जा, आपण नोकरीसाठी म्हणून जे क्षेत्र निवडताय त्यामध्ये आवडीने काम करा. आपली वैयक्तिक आवड काय आहे. हे ओळखा आणि त्या आवडीच्या क्षेत्रात काम करा. स्वत:चे वेगळेपण जपा. वेळेचे अपव्यय टाळा. प्रत्येक यशस्वी व्यक्तीचे एक गोष्ट असते. अशा जगभरातील अनेक गोष्टी एकत्र करून पाहिल्या तर त्या सर्वांनी आपल्या ध्येयावर विलक्षण लक्ष केंद्रित केलेले दिसते. त्याप्रमाणे आपण सर्वजण आपल्या काय आवडते हे शोधा. त्यासाठी वेळ काढा. आपल्या भविष्याच्या मार्गक्रमणासाठी तो मार्ग निवडा. वेळेचा अपव्यय टाळून नेहमी आशावादी रहायला शिका. असेही मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगताच्या प्रारंभी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कोणतेही यश हे कठोर परिश्रमाशिवाय मिळत नाही. त्यासाठी आपले ध्येये उच्च ठेवा. आपल्या चांगल्या ध्येयासाठी हे महाविद्यालय, येथील सर्व शिक्षक आणि रयत शिक्षण संस्था सतत आपल्या सोबत आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी रयत शिक्षण संस्था सतत विविध उपक्रम राबवत असते. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्काराचे वाचन डॉ. बी. बी. घुरके यांनी केले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सत्कार वाचन डॉ. जे. एम. पालकर यांनी केले. या व्याख्यानास वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या प्रो. डॉ. एम. बी. देसाई, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. ए. पी. उबाळे, अंतर्गत हमी कक्षाचे प्रमुख डॉ. यु. एस. शेळके तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख इतर सर्व स्टाफ व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाचे विभागप्रमुख डॉ. समाधान पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्यामल हुंबरे यांनी केले. तर डॉ. सुप्रिया खोले यांनी सर्वाचे आभार मानले.


