महाराष्ट्रातील बँक अधिकाऱ्यांचे आंदोलन तीव्र; ३० हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी
मिरज (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रात आजपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सुमारे ३०,००० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व अधिकृत व्हॉट्सअॅप गटांमधून बाहेर पडत संघटित शक्तीचे प्रदर्शन केले आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) च्या आवाहनानुसार सुरू झालेल्या या आंदोलनाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे आंदोलन कामगिरीशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय – परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह) या नव्या धोरणाविरोधात असून, सरकारकडून होत असलेल्या विभागणीच्या प्रयत्नांविरोधात तीव्र निषेध म्हणून पाहिले जात आहे. यूएफबीयूने हा निर्णय द्विपक्षीय कराराच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचारी काळे बॅज किंवा काळ्या फिती लावून निषेध नोंदवत आहेत. तसेच, सर्व कामकाज केवळ नियम व प्रक्रियेनुसारच केले जात असून कोणतेही अतिरिक्त किंवा अनौपचारिक सहकार्य पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सर्व शाखांमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच कामकाज पूर्ण करून शाखा बंद केली जात आहेत. त्यानंतर कोणतेही अधिकृत दूरध्वनी कॉल किंवा आभासी बैठक (व्हर्च्युअल मीटिंग) घेतल्या जात नाहीत. अधिकाऱ्यांनी ८ तासांच्या कामकाजाच्या नियमांचे काटेकोर पालन सुरू केले आहे.
या आंदोलनादरम्यान अधिकारी कोणत्याही अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहत नसून, शांततापूर्ण व शिस्तबद्ध मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कोणताही दबाव किंवा त्रास झाल्यास तात्काळ संघटनेला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एआयबीओसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष कॉ. निलेश पवार म्हणाले, पीएलआयच्या नावाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कृत्रिम विभागणी केली जात आहे. हा निर्णय अन्यायकारक असून बँकिंग क्षेत्रातील एकात्मतेस धोका निर्माण करणारा आहे. एआयबीओसीचे राज्य सचिव कॉ. प्रमोद शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील हजारो अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅप गटांमधून बाहेर पडत आणि सायंकाळी ६ नंतर अतिरिक्त काम बंद करत एकजुटीचे दर्शन घडवले आहे. हा लढा आपल्या हक्कांसाठी असून, गरज पडल्यास पुढील टप्प्यात अचानक संपही केला जाईल. संघटनांनी इशारा दिला आहे की, सरकार व बँक व्यवस्थापनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर पुढील टप्प्यात अचानक संपाची घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, या आंदोलनामुळे राज्यातील बँकिंग व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असून, येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


