मिरजेत खाडे शैक्षणिक संकुलमध्ये ‘रोबोटिक लॅब’चे उत्साहात उद्घाटन

0
mtdk scholl

मिरज (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने मातोश्री तानुबाई दगडू खाडे (एमटीडीके) इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरज येथे अत्याधुनिक ‘रोबोटिक्स प्रयोगशाळे’चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे आणि संचालिका रसिकाताई सुजित खाडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ‘रोबोस्टॉर्म्स’ यांच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, संगणक प्रोग्रामिंग (कोडिंग) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या क्षेत्रांतील प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून नाविन्यपूर्ण संशोधन आणि कौशल्य विकासाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. शाळेने “प्रेरणादायी विचार, उज्ज्वल भविष्याची उभारणी” या संकल्पनेतून सुरू केलेली ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी दिशा देणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना रोबोट तयार करणे, संगणक प्रोग्रामिंग शिकणे, मोटर्स व गिअर यंत्रणेचे कार्य समजून घेणे, तार्किक विचारक्षमता विकसित करणे तसेच विविध रोबोटिक्स संचांच्या साहाय्याने प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञानासोबतच अनुभवाधारित शिक्षणालाही चालना मिळणार आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी यावेळी सांगितले की, “आजच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडणे ही काळाची गरज आहे. ही रोबोटिक्स प्रयोगशाळा त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम बनवेल.”

उद्घाटन सोहळ्यास शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, रसिकाताई खाडे आणि सुजित खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील तंत्रज्ञानाशी त्यांची नाळ जोडण्यासाठी उचललेले हे पाऊल शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *