विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाण्याची सुविधा; मिरजेत महापालिका शाळा क्रमांक २२ मध्ये उपक्रम
मिरज (प्रतिनिधी)
शहरातील वॉर्ड क्र. ४ मधील मनपा शाळा क्र. २२ येथे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या वॉटर फिल्टर आणि पाण्याच्या टाकीचे उद्घाटन मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
शाळेतील जुन्या पाण्याच्या टाकीची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. ही गरज ओळखून फिरोज नदाफ यांच्या देणगीतून नवीन वॉटर फिल्टर बसविण्यात आला, तर पाण्याच्या टाकीचे नियोजन आणि संपूर्ण काम आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ. महेश कुमार कांबळे यांनी स्वखर्चातून पूर्ण केले.
सन १९८४ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत सध्या बालवाडी ते इयत्ता सातवीपर्यंत सुमारे ११० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खाजगी शाळांच्या वाढत्या स्पर्धेतही ही महापालिकेची शाळा आपली वेगळी ओळख टिकवून आहे. विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. यावेळी डॉ. महेश कुमार कांबळे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही दिली. तसेच महानगरपालिका शाळांकडे अधिक लक्ष देण्याची विनंतीही महापौरांकडे करणार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक किरण चौगुले, डॉ. महेश कुमार कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक अरुण कदम, निलेश वायदांडे, पिंटू कांबळे तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


