धार-पवार परिवाराला एकत्रीत करून जीवन उज्वल करण्याचे प्रयत्न ः सागरदादा पवार
निपाणी,ता.12(प्रतिनिधी)-
देशात सर्व समाजाची मंडळी एकत्रीत येवून आपला विकास घडवित असताना इतिहासात मोठे नांव असलेला धार-पवार परिवार कुठेतरी मागे पडत होता. त्यामुळे 13 वर्षापूर्वी श्रीमंतराजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली. या माध्यमातून 4.50 ते 5 लाख धार-परिवाराला एकत्रीत करून त्यांचे जीवन उज्वल करण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धार-पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागरदादा पवार यांनी दिली.
निपाणीसह सीमा भागातील समस्त धारपवार परिवारातील बंधू-भगिनींचा एकत्रीकरण बैठक व परिचय मेळावा आज रविवार दि.12 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता वाल्मिकी भवन साखरवाडी येंथे आयोजीत करण्यात आला होता. यावेळी सागरदादा बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे माजी महापौर मंगेश पवार, श्रीमंत दादाराजे देसाई-निंबाळकर सरकार, कोल्हापूर शिवसेना उपनेते संजय पवार, डॉ. भालचंद्र पवार, गोविंद पवार, दिगंभर पवार, विलास पवार, विश्वासराव पवार, भिमराव पवार, आण्णासो पवार, पुरातन आणि शास्त्र शत्र संंग्रह व अभ्यासक अमरसिंह पाटील-धारपवार, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेश वैद्य म्हणाले, धार पवार घराण्याला मोठा इतिहास आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू म्हणून या घराण्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेत पवारांनी पराक्रमांनी मोहिम फत्ते केली आहे. महाराष्ट्रातील 96 कुळी क्षत्रिय मराठा घराणे हे प्राचीन क्षत्रिय राजघराण्याचे वंशज आहेत. या 96 कुळी क्षत्रिय मराठ्यांमध्ये पवार घराणे हे एक मुख्य कुळी म्हणुन गणले जाते. हे पवार घराणे प्राचीन क्षत्रिय राजपूत परमार राजवंशाची एक शाखा आहे. या प्राचीन क्षत्रिय राजवंशाचा उदय राजस्थानातील आबू पर्वत येथे झाला. तेथून हा राजवंशमध्ये भारतातील उज्जैन व धारा नगरी येथे आला व पुढे आपल्या पराक्रमाने भारतातील चक्रवर्ती सम्राट पदाचा मानकरी झाला. या प्राचीन क्षत्रिय राजवंशाचे मुख्य सत्ताकेंद्र अथवा राजधानी धारानगरी म्हणजेच आजचे धार हे होते.
मध्यभारतातील माळवा प्रांतातील ही धारानगरी परमार राजवंशाच्या कालखंडात एक संंपन्न व सुसंंस्कृत नगर म्हणुन प्रसिद्ध होते. धार येथील या प्रसिद्ध परमार राजवंशाच्या शाखा महाराष्ट्रात विवध कालखंडात आल्या व येथेच स्थायिक झाल्या. महाराष्ट्रात आल्यावर परमार राजवंशाला पवार संबोधू जावू लागले. तसेच धार येथून आल्यामुळे त्यांना धारचे पवार ही म्हटले जावू लागले हे घराणे मोठे आहे. या परिवाराला मोठा इतिहास असल्याचे सांगितले.
यावेळी कोल्हापूर शिवसेना उपनेते संजय पवार यांनी धार पवार घराण्याला एकत्रीत करण्याचे मोठे काम सागरदादा पवार यांनी केले असून या कार्यात आपण येथून पुढे अग्रेसर राहू असे सांगितले. तर डॉ.भालचंद्र पवार, मंगेश पवार, राजेश पवार, भिमराव पवार यांनीही विचार व्यक्त केले.
यावेळी विलास पवार, नेताजी पवार, शहाजी पवार, जयंत पवार, सचिन पवार, जयंत पवार, ओकार पवार, सुनिल पवार यांच्यासह निपाणी सीमाभागातील शेकडो धार-पवार घराण्यातील महिला, पुरूषासह युवक, युवती उपस्थित होत्या. स्वागत व आभार डी.के. पवार यांनी मानले.


