अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील निधीवर अनियमितता ; डॉ. महेशकुमार कांबळे यांचा आरोप
मिरज (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना’ अंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
डॉ. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, माजी सभापती अनीता मोहन वनखंडे यांच्या कार्यकाळात अवघ्या दोन वर्षांत सुमारे 60 ते 65 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. याशिवाय इतर कालावधीतही 22 ते 25 कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र एवढ्या मोठ्या निधीनंतरही दलित व वंचित वस्त्यांमध्ये अपेक्षित विकासकामे झालेली दिसून येत नाही.
हा निधी मूळ उद्देशापासून विचलित होऊन इतरत्र खर्च करण्यात आल्यामुळे दलित व बहुजन समाजावर अन्याय झाल्याचा दावा करत त्यांनी सांगली येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी ९ एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाने दखल घेत, संबंधित 41 कामांवर (अंदाजे 10 कोटी 20 लाख रुपये) स्थगिती का देऊ नये, याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच प्रशासक व आयुक्त यांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान, यासंदर्भात डॉ. कांबळे यांनी जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनाही निवेदन देत मुख्यमंत्री स्तरावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत त्यांच्या स्मारक व पुतळ्यांवर गेल्या काही वर्षांत कोणताही खर्च करण्यात आलेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी न झाल्यास येत्या आठ दिवसांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा डॉ. महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे.


