शेक्सपियरची नाटके चिरकालीन असून त्यामध्ये मानवी जीवनाचे चिरंतन तत्त्वज्ञान – प्रा. आर. बी. पाटील
लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालयात वाचन दिन साजरा
मिरज (प्रतिनिधी)
वाचन दिन आणि जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या ४६२ व्या जयंतीनिमित्त लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालय, मिरज येथे निसर्गाच्या सान्निध्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रा. आर. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात प्रा. पाटील यांनी विल्यम शेक्सपिअर यांच्या साहित्याचा सखोल आढावा घेत शोकांतिका, सुखांतिका आणि सुनीत काव्य या साहित्यप्रकारांचे महत्त्व स्पष्ट केले. शेक्सपियरची नाटके चिरकालीन असून त्यामध्ये मानवी जीवनाचे चिरंतन तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडलेले आहे. त्यांच्या नाटकांतील विषय हे सर्व युगांमध्ये तितकेच लागू पडतात. यावेळी त्यांनी ‘हॅम्लेट’, ‘ऑथेलो’, ‘मॅकबेथ’, ‘किंग लिअर’ आणि ‘रोमिओ आणि ज्युलिएट’ या शोकांतिका नाटकांतील प्रसंगांचा उल्लेख करत, रंगभूमीवर सादरीकरणानंतर प्रेक्षक कसे मंत्रमुग्ध होतात हे सांगितले. तसेच, शेक्सपियरच्या शोकांतिकांतील नायकांचा शेवट हा नशिबामुळे नव्हे, तर त्यांच्या स्वभावदोषांमुळे होत असल्याचे स्पष्ट केले.
शेक्सपियरच्या नाटकांवरील प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, तर भित्तिपत्रिकेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन ॲड. सरोज रायनाडे यांच्या हस्ते झाले. ग्रंथालयात शेक्सपियरच्या नाटकांचे व संदर्भग्रंथांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पी. बी. भंडारे यांनी केले. यावेळी यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲड. सरोज रायनाडे, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच मिरज शहरातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंग्रजी विभागप्रमुख डॉ. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.


