पाच राज्यातील भाजपच्या नेत्रदीपक कामगिरीचा मिरजेत जल्लोष
आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी धरला हालगीवर ठेका
मिरज दि.४ (प्रतिनिधी)
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या देदिप्यमान विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरज विधानसभा क्षेत्र भाजपच्या वतीने या विजयाचा जल्लोष मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी स्वतः हलगीच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजारी करण्यात आली व नागरिकांना पेढे आणि साखर वाटप करण्यात आले.
सोमवारी सकाळी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “नरेंद्र मोदी झिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली कार्यकर्त्यांनी एकमेकांना साखर-पेढे भरवून आनंद व्यक्त केला.आमदार खाडे यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोषात सहभाग घेत विजयाचा आनंद साजरा केला.
“पश्चिम बंगाल, पुडूचेरी आणि आसाम या राज्यांतील भाजपचा विजय हा केवळ पक्षाचा नाही तर संपूर्ण देशाचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांवर आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीवर जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीतही महायुतीने यश मिळवून जनतेचा कल स्पष्ट केला आहे.”असा विश्वास आमदार खाडे यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक मोहन वाटवे, जिल्हा सरचिटणीस: बाबासाहेब आळतेकर, धनंजय कुलकर्णी. नगरसेवक गणेश दादा माळी, विद्याताई नलवडे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, विवेक (बंडू) शेटे, मनीष देशपांडे, अभिजित गौराजे, रमेश मेंढे, राकेश शिंदे, विक्रम पाटील, महेश धयारे, अजिंक्य हंबर, चैतन्य भोकरे, महेश फोंडे, माजी सरपंच तानाजी पाटील, अजित दोरकर, आप्पा झांबरे, अभिजित लाड, महिला आघाडीच्या अनिता हारगे, रूपाली गाडवे, शोभा गाडगीळ, अनघा कुलकर्णी, रूपाली देसाई यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या विजयामुळे मिरजेतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.


