करजगी चिमुकली हत्या प्रकरणातील ऐतिहासिक निकालाप्रित्यर्थ मदनी ट्रस्टकडून सत्कार
सांगली (प्रतिनिधी)
जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झालेल्या गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगलीतर्फे या खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रकरणाचा मदनी चॅरिटेबल ट्रस्टने सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा केला. पोलिसांनी अवघ्या १३ दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयीन प्रक्रियेत जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे यांनी सरकारी पक्षाची भक्कम बाजू मांडत साक्षी, पुरावे आणि कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध केले. तसेच ट्रस्टतर्फे विशेष वकील म्हणून ॲड. तोहीद रियाज जमादार यांनीही सातत्याने पाठपुरावा करून प्रभावी युक्तिवाद केला. दोन्ही वकिलांच्या प्रयत्नांमुळे न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत ऐतिहासिक निकाल दिला.
तपासादरम्यान तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उमदी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि जत विभागाचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी तपासाला योग्य दिशा देत महत्त्वाची भूमिका बजावली. या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कार समारंभात तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे आणि ॲड. तोहीद रियाज जमादार यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, सुफियान पठाण, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन आणि विधिज्ञांच्या कार्याचे कौतुक करत अशा कठोर शिक्षेमुळे महिलांवरील व बालकांवरील अत्याचारांविरोधात प्रभावी संदेश जाईल, असा विश्वास व्यक्त केला.


