पाच वर्षांखालील बालकांच्या कर्णशस्त्रक्रियेचा खर्च आता महात्मा फुले योजनेतून – ना. आबिटकर

0
761546281_871979762405975_8177430614633597460_n

आमदार इद्रीस नायकवडी यांच्या पाठपुराव्याला यश, मिरजेत महाआरोग्य शिबिरात निर्णय जाहीर

मिरज (प्रतिनिधी)

लहान मुलांच्या कर्णशस्त्रक्रियेसाठी (कॉक्लिअर इम्प्लांट) असलेली वयोमर्यादा शून्य ते दोन वर्षांवरून वाढवून शून्य ते पाच वर्षांपर्यंत करण्यात आली असून, या शस्त्रक्रियेसाठी लागणारा संपूर्ण खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपलब्ध करून दिला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रीस नायकवडी वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रीस नायकवडी, शिवसेना नेते मोहन वनखंडे, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, आबासाहेब म्हैसाळकर, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे, नगरसेवक अतहर नायकवडी, श्वेतपद्म कांबळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, लहान मुलांच्या कर्णशस्त्रक्रियेसाठी वयोमर्यादा वाढविण्याची मागणी आमदार इद्रीस नायकवडी यांनी विधिमंडळात सातत्याने मांडली होती. या पाठपुराव्यामुळे शासनाने केंद्राची मान्यता घेऊन शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारा खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे.

आमदार इद्रीस नायकवडी यांनी सांगितले की, दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारत या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असून विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्यातील नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांवर तपासणी, निदान व उपचाराबाबत मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये तपासणी झालेल्या गरजू रुग्णांवर पुढील आवश्यक शस्त्रक्रिया व उपचारही विनामूल्य करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांचे कौतुक केले. अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीला सामाजिक कार्याचा खरा अर्थ प्राप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आमदार इद्रीस नायकवडी यांच्या पुढाकारातून आयोजित या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा तुफान प्रतिसाद लाभला १४ नामांकित रुग्णालयांतील ६० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून ७ हजारांहून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रियांचे नियोजन व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *