मालगाव येथील वॉटर पार्कमध्ये पर्यटकांना मारहाण; मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा

0
WhatsApp Image 2026-05-03 at 3.41.29 PM

मिरज (प्रतिनिधी)
मालगाव (ता. मिरज) येथील बळीराजा वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी गेलेल्या पर्यटकांना तेथील कामगारांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी वॉटर पार्कच्या मॅनेजरसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. २ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याबाबत अमोल अशोक चौगुले (वय ४५, रा. अंकलखोप, ता. पलूस) यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी चौगुले हे त्यांच्या कुटुंबीयांसह बळीराजा वॉटर पार्क येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी वॉटर पार्कमधील स्लाइडिंग करत असताना ते आणि त्यांची पत्नी बसलेली ट्यूब तेथील निरंजन नामक कर्मचाऱ्याने अचानक पलटी केली. याबाबत चौगुले यांनी जाब विचारला असता “ही आमची पद्धत आहे” असे सांगत त्याने दमदाटी केली. यानंतर निरंजन याच्यासह अवधूत पाटील, अक्षय पाटील, मैफूज सय्यद, मॅनेजर पाटील आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींनी चौगुले व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत चौगुले यांचे भाऊ, पत्नी आणि भाऊजई असे एकूण चार जण जखमी झाले. तसेच निरंजन याने फिर्यादीच्या दोन मुलांना ढकलल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी संबंधित आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *