मिरज पंचायत समितीच्या इमारतीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामफलक हटविल्याने तणाव
आंबेडकरी बांधवांकडून पुन्हा नामफलक लावण्याचा इशारा ; गटविकास अधिकारी नॉट रिचेबल
मिरज (प्रतिनिधी)
मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीवर लावण्यात आलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक हटविण्यात आल्याने आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करावी तसेच तत्काळ पुन्हा नामफलक लावावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावून नामकरण केले होते. मात्र शनिवारी सकाळी हा फलक हटविण्यात आल्याचे समजताच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पंचायत समितीकडे धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरच रोखले. यावेळी बोलवाडूचे उपसरपंच सचिन कांबळे, अशोक कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गेटसमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना सचिन कांबळे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनावर जातीयवादी भूमिका घेतल्याचा आरोप केला. “प्रसंगी बलिदान द्यावे लागले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या इमारतीवर पुन्हा लावणारच,” असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, शनिवारी शासकीय सुट्टी असल्याने पंचायत समिती कार्यालय बंद होते. गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.
छत्रपती संभाजी महाराजांचे नावही हटविले
नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला भाजपच्या वतीने देण्यात आलेले ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह’ हे नावही प्रशासनाने हटविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कारवाईवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.


