मिरज पं. स. समोर सोमवारी ठिय्या आंदोलन – सचिन कांबळे
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक
मिरज (प्रतिनिधी)
मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याच्या मागणीसाठी, तसेच प्रशासनाने दोन्ही नामफलक हटवल्याच्या निषेधार्थ सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी दिली. हा निर्णय मिरज येथे झालेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, माजी नगरसेवक सचिन सावंत, अशोक कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे नेते श्वेतपद्य कांबळे, महावीर कांबळे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, प्रफुल्ल ठोकळे, दौलत कांबळे, अजित कांबळे, कुमार बनसोडे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, काँग्रेसचे प्रमोद इनामदार, मल्लेवाडीचे रवींद्र कांबळे, मालगावचे विश्वास खांडेकर, कवलापूरचे माजी सभापती सदाशिव खाडे, आकाश कांबळे, कपिल कबाडगे, जितेंद्र पाटील तसेच ग्रामीण भागातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन कांबळे म्हणाले की, पंचायत समितीच्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आणि प्रशासकीय इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कायमस्वरूपी देण्यात यावे, ही आंदोलनाची प्रमुख मागणी असणार आहे. याशिवाय प्रशासनाने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सभागृह व इमारतीवरील नामफलक हटविल्याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येणार आहे.
प्रभारी सभापती, सदस्यांनाही माहिती नव्हती…
सध्या पंचायत समितीचा कारभार प्रभारी सभापतींकडे असून माजी पदाधिकारी व सदस्यही कार्यरत आहेत. मात्र, सभागृह व प्रशासकीय इमारतीवरील नामफलक हटविण्याचा निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असा आरोप सचिन कांबळे यांनी केला. प्रशासनाने एवढ्या घाईत नामफलक का हटवले? त्यामागे नेमका कोणाचा आदेश होता? आणि कोणत्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली? या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


