नवनाथ गोरे यांच्या ‘बंधाटी’ कादंबरीला विशेष साहित्य पुरस्कार जाहीर
मिरज (प्रतिनिधी)
नवनाथ गोरे यांच्या बंधाटी कादंबरीला वाड्मय चर्चा मंडळ, बेळगाव यांच्यावतीने दिला जाणारा वाड:मय चर्चा मंडळ विशेष साहित्य पुरस्कार जाहीर झाला. त्याचे वितरण बेळगाव येथे १० मे यादिवशी होणार आहे. ‘फेसाटी’ या आपल्या पहिल्याच कादंबरीने महाराष्ट्रभर प्रसिद्धीस पावलेल्या नवनाथ गोरे यांची ‘बंधाटी’ ही दुसरी अनवट कादंबरी आनंद प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केली आहे.
गावगाडा, शेती-मातीत रमणाऱ्या या लेखकाने गंभीर सामाजिक प्रश्नांकडे नेहमीच लक्ष वेधले आहे. जगले, भोगले ते त्यांनी लिहिले आहे. शेतकरी नेहमीच अनेक विळख्यात अडकलेला असतो. बांध बंधिस्तीचे वाद आणि मोजणीचे माप नेहमीच त्याच्या पदरात रिकामे होत आले आहे. रक्ताचा टिळा लावला तरी हे प्रश्न पिढ्यानपिढ्या सुटत नाहीत. जमिनीच्या वादातून निर्माण झालेले भीषण वास्तव ही कादंबरी अधोरेखित करते. मराठी, कानडी बोली भाषेतील शब्दभांडार या कादंबरीत आले आहे. ग्रामीण जगणे हे समुहाचे जगणे असते. त्यामुळे ‘बंधाटी’ कादंबरीचा एकच नायक अथवा नायिका नाही. यात अनेक पात्र वेगवेगळ्या भूमिका घेऊन येतात. साहित्य क्षेत्रासह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यापुर्वी ‘फेसाटी’ कादंबरीला २०१८ चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. यामुळेच माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी त्यांना भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी दिली. लिखाणाला बळ दिले.


