केंद्रीय आरोग्य योजनेत सिनर्जी हॉस्पिटलचा समावेश ; दक्षिण महाराष्ट्रातील CGHS लाभार्थ्यांना मोठा दिलासा
मिरजमधील एकमेव मान्यताप्राप्त रुग्णालय; केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी व कुटुंबीयांना मिळणार लाभ
मिरज (प्रतिनिधी)
दक्षिण महाराष्ट्रातील केंद्र शासनाचे कर्मचारी, निवृत्त कर्मचारी (पेन्शनधारक) आणि त्यांच्या पात्र कुटुंबीयांसाठी मिरज येथील सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला केंद्र सरकारच्या केंद्रीय सरकारी आरोग्य योजना (सीजीएचएस) अंतर्गत अधिकृत मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे मिरज व परिसरातील सीजीएचएस लाभार्थ्यांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असून, या भागातील सीजीएचएसअंतर्गत मान्यताप्राप्त एकमेव रुग्णालय म्हणून सिनर्जी हॉस्पिटलची नोंद झाली आहे.
सीजीएचएस योजनेचा उद्देश केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुलभ, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे. या मान्यतेनंतर लाभार्थ्यांना योजनेच्या नियमांनुसार तपासण्या, शस्त्रक्रिया, अतिदक्षता सेवा आणि विविध आजारांवरील उपचार मिरजमध्येच मिळणार आहेत. त्यामुळे उपचारासाठी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सिनर्जी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथलॅब, हृदयरोग अतिदक्षता विभाग, हृदय व रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रियांची सुविधा, स्वतंत्र अतिदक्षता विभाग, अस्थिरोग, मूत्रपिंड विकार व डायलिसिस, मेंदू व मज्जासंस्था विकार, मूत्ररोग, बालरोग, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, कान-नाक-घसा विकार, कर्करोग उपचार तसेच जनरल मेडिसिनसह अनेक विशेष वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुग्णकेंद्रित सेवा देण्यावर रुग्णालयाचा भर आहे.
या मान्यतेचा लाभ सांगली, मिरज, कुपवाड, इस्लामपूर, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, पलूस, विटा तसेच कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि दक्षिण महाराष्ट्रातील इतर भागांतील सीजीएचएस लाभार्थ्यांना होणार आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले की, सीजीएचएसची मान्यता ही संस्थेसाठी अभिमानाची बाब असून केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पारदर्शक, गुणवत्तापूर्ण व रुग्णाभिमुख आरोग्यसेवा देण्यासाठी हॉस्पिटल कटिबद्ध आहे. तसेच रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, माजी सैनिक आरोग्य योजना (ईसीएचएस), कर्मचारी राज्य विमा योजना, आयुष्मान भारत तसेच विविध कॅशलेस आरोग्य योजनांचाही लाभ उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.


