‘आमचा बाप काढणाऱ्यांना आज उत्तर दिले’; सत्तांतरानंतर खाडे, संजयकाकांचा विरोधकांवर निशाणा
विरोधकांना फैलावर घेत पहा काय म्हणाले आ. डॉ. सुरेश खाडे
मिरज (प्रतिनिधी)
मिरज पं. स. मध्ये काही स्वयंघोषित नेते निर्माण झाले होते. त्यांचे वर्चस्व आमच्या घराण्याच्या वाडवडिलांपर्यंत पोहोचत असेल, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली होती, असे आम्ही ठरवले होते. ज्यांनी आमच्या वडिलांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले, त्यांना आज त्याचे योग्य प्रत्युत्तर मिळाले आहे. यापुढे आमच्या वाट्याला आलात, तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. आमच्या वडिलांबद्दल बोलणाऱ्यांना आज आम्ही त्याच भाषेत उत्तर दिले आहे, अशी टीका माजी मंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी खासदार विशाल पाटील यांचे नाव न घेता केली.
माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, आमचे सहकारी, माजी मंत्री व आमदार यांच्या वडिलांपर्यंत टीका करण्याची भूमिका विरोधकांनी घेतली, त्याच दिवशी आम्ही ठरवले होते की, ज्याला घोड्यावर बसवता येते, त्याला खालीही उतरवता येते. आजच्या निवडणुकीत त्याची प्रचिती आली. यापुढे अशा प्रकारचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडी आणि भाजप महायुतीकडून स्वतंत्र उद्घाटन सोहळे पार पडले होते. या कार्यक्रमांदरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीकास्त्र सोडण्यात आले होते. त्याच संदर्भाचा उल्लेख करत आज सभापती व उपसभापती निवडीनंतर माजी मंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनी खासदार विशाल पाटील व शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
आ. खाडे म्हणाले, महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकजुटीने काम केल्यामुळे विरोधकांना उमेदवारी अर्ज भरण्याचीही संधी मिळाली नाही. आता ते बहिष्कार टाकल्याचे सांगतील. त्यांना अर्ज दाखल करण्यापासून कुणीही रोखले नव्हते. मात्र, आपल्याकडे आवश्यक संख्याबळ नसल्याची जाणीव झाल्यानेच त्यांनी अर्ज भरला नाही. विकासाच्या भूमिकेतून सर्व सदस्य महायुतीसोबत आले आहेत. आमदार म्हणून पंचायत समितीतील सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. पंचायत समितीत अनेक घडामोडी घडल्या, न्यायालयीन लढाईही झाली. मात्र न्यायालयाने आणि मंत्रालयाने आम्हाला न्याय दिला. जनतेला अपेक्षित असलेला निर्णय आज झाला. ज्या दिवशी भाषणातून आमच्या वडिलांचा उल्लेख करण्यात आला, त्याच दिवशी पंचायत समितीत सत्तांतर घडवून आणण्याचा निर्धार केला होता. आज त्यांची अशी अवस्था झाली की, त्यांना उमेदवारी अर्जही दाखल करता आला नाही.
माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, आमच्या सहकारी आमदारांच्या वडिलांपर्यंत टीका करण्याची भूमिका त्यांनी घेतली, त्याच दिवशी आम्ही ठरवले होते की, ज्याला घोड्यावर बसवता येते, त्याला खालीही उतरवता येते. आजच्या निवडणुकीत ते स्पष्ट दिसून आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचेही धाडस त्यांना झाले नाही. आणखी दोन सदस्य आमच्या बाजूने मतदान करण्यास तयार होते. त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठीच त्यांनी बहिष्काराचे नाटक केले. तालुक्याचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. येथे येऊन कोणी शिवीगाळ किंवा दमबाजी करत असेल, आमचे आमदार मागासवर्गीय समाजातील आहेत म्हणून त्यांच्याशी असा व्यवहार केला जाणार असेल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
“बूंद से गई, हौद से नहीं आती”
विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याच्या निर्णयावर टीका करताना संजयकाका पाटील आणि आ. सुरेशभाऊ खाडे यांनी विरोधकांवर शाब्दिक निशाणा साधला. आणखी दोन सदस्य आमच्या बाजूने येणार होते. त्यामुळे “बूंद से गई, हौद से नहीं आती” ही म्हण लक्षात घेऊन नामुष्की झाकण्यासाठीच विरोधकांनी बहिष्काराचा मार्ग स्वीकारला, अशी टीका संजयकाका पाटील यांनी केली. तर आ. खाडे म्हणाले, महायुतीच्या एकजुटीमुळे विरोधकांना उमेदवारी अर्ज भरण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे आता ते बहिष्काराचे कारण पुढे करत आहेत. “नाचता येईना अंगण वाकडे” अशीच त्यांची अवस्था झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.


