मिरज पंचायत समितीत महायुतीचा झेंडा; सभापतीपदी राणी भोरे, उपसभापतीपदी ललिता शेजूळ बिनविरोध
मिरज (प्रतिनिधी)
मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या फेरनिवडीत महायुतीने बाजी मारत पंचायत समितीवरील सत्ता आपल्या ताब्यात घेतली. महाविकास आघाडीतील बदललेल्या राजकीय समीकरणांचा फायदा घेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने स्पष्ट बहुमत सिद्ध केले. भाजपच्या राणी सचिन भोरे यांची सभापतीपदी, तर शिवसेना (शिंदे गट)च्या ललिता अशोक शेजूळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
यापूर्वी झालेली सभापती-उपसभापती निवड अपहरण प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तत्कालीन सदस्य पांडुरंग इंगळे मतदानासाठी गैरहजर राहिल्याने काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची सभापती, तर ललिता शेजूळ यांची उपसभापती म्हणून निवड झाली होती. या प्रक्रियेवर भाजपच्या राणी भोरे आणि पांडुरंग पाटील यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. सुनावणीनंतर पुणे विभागीय आयुक्तांनी ती निवड रद्द ठरवत नव्याने निवड घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑगस्ट रोजी विशेष सभा बोलावण्यात आली.
फेरनिवडीपूर्वी पंचायत समितीतील राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या एरंडोलीच्या तवटे आणि कसबे डिग्रजच्या संयोगिता कोळी यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट)चे पांडुरंग इंगळे यांनीही महायुतीच्या बाजूने भूमिका घेतली. माजी उपसभापती ललिता शेजूळ यांनीदेखील महायुतीत सहभागी होत उपसभापतीपदाची उमेदवारी स्वीकारली. या घडामोडींमुळे महायुतीचे संख्याबळ १४ वर पोहोचले, तर महाविकास आघाडीचे संख्याबळ ८ झाले. आवश्यक बहुमत नसल्याने महाविकास आघाडीचे सदस्य विशेष सभेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे सभापतीपदासाठी राणी भोरे आणि उपसभापतीपदासाठी ललिता शेजूळ यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या सत्तांतरामागे माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या राजकीय नियोजनाची चर्चा रंगली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रितपणे सत्ता समीकरणे आपल्या बाजूने फिरवण्यात यश मिळवले. निवडीनंतर झालेल्या सत्कार कार्यक्रमात आमदार डॉ. सुरेश खाडे, माजी खासदार संजयकाका पाटील आणि निशिकांतदादा पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विरोधकांवर टीका करत, “महायुतीकडे नेतृत्व घडवण्याची ताकद आहे, तसेच गरज पडल्यास राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता देखील आहे. संख्याबळ नसल्यामुळे विरोधकांनी उमेदवारी देण्याचेही टाळले,” असा टोला लगावला.
निकाल जाहीर होताच पंचायत समिती परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला. या फेरनिवडीमुळे मिरज पंचायत समितीतील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावरही त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


