खासगी शाळेसाठी मनपाची शाळा बंद करण्याचा प्रयत्न ; योगेंद्र थोरातांचा आ. नायकवडींवर आरोप

0
1001631375

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आ. इद्रीस नायकवडी यांच्याशी संबंधित शाळेसाठी प्रभाग २० मधील महापालिका शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत योगेंद्र थोरात व डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आ. इद्रीस नायकवडी, त्यांचे पुत्र नगरसेवक अतहर नायकवडी तसेच मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले.

या पत्रकार परिषदेला माजी नगरसेविका स्वाती पारधी, नितेश कांबळे, महादेव नलवडे, फिरोज जमादार, माजी नगरसेवक अजित दोरकर तसेच भाजप पदाधिकारी ज्योती कांबळे उपस्थित होते.

योगेंद्र थोरात यांनी सांगितले की, नगरसेवक आणि प्रशासक कार्यकाळात त्यांनी प्रभाग क्रमांक २० मधील सहा महापालिका शाळांसाठी विविध माध्यमांतून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्या निधीतून शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उभारण्यात आल्या.

थोरात यांच्या म्हणण्यानुसार, सन २०१२ मध्ये आ. नायकवडी यांनी स्वतःची खाजगी शाळा चालवण्यासाठी महापालिकेची शाळा क्रमांक ७ बंद पाडली होती. हीच शाळा पुढे त्यांनी पुन्हा सुरू करून पुनर्जीवित केली आणि तिचा दर्जा उंचावत राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शाळा बनवली. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक २० मधून निवडून आलेले नगरसेवक अतहर नायकवडी यांची या शाळेवर वक्रदृष्टी असून शाळा बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शाळेबाहेर प्रवेशबंदीचे फलक लावणे, पालकांचे दूरध्वनी क्रमांक दबाव टाकून मिळवणे तसेच पालकांना फोन करून “महापालिकेची शाळा बंद होणार” अशी अफवा पसरवली जात असल्याचा दावा थोरात यांनी केला.

तसेच, आ. नायकवडी यांच्याशी संबंधित अंजुमन शाळा आणि मिरज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी महापालिका शाळेसमोर खाजगी शाळांचे जाहिरात फलक लावण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. या सर्व प्रकारामागे आ. इद्रीस नायकवडी, नगरसेवक अतहर नायकवडी आणि मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *