तानंग फाट्याजवळ भीषण अपघात ; ग्रामसेवक महेश म्हमाणे जागीच ठार
मिरज (प्रतिनिधी)
जत तालुक्यातील धावडवाडी येथील मूळ रहिवासी तथा कोसरी येथील ग्रामसेवक महेश मनोहर म्हमाणे (वय ५५) यांचा तानंग फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या इंडिका कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश म्हमाणे हे आपल्या इंडिका कार (एमएच १८ टी २४५) मधून जतहून सांगलीकडे येत होते. तानंग फाट्याजवळील एका धाब्यासमोर मिरजकडील बाजूस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला (जीजे ०४ पीबी ८१९५) त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका जबरदस्त होता की इंडिका कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली.
या भीषण अपघातात महेश म्हमाणे हे कारमध्येच अडकून पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी ते कारमध्ये एकटेच प्रवास करत होते. घटनेनंतर महामार्ग वाहतूक पोलीस आणि ग्रामीण पोलीसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.
पोलीस आणि बचाव पथकाने क्रेनच्या सहाय्याने इंडिका कार कंटेनरमधून बाहेर काढली. त्यानंतर म्हमाणे यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश म्हमाणे हे जत तालुका ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होते. म्हमाणे हे सध्या मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंबासह सांगली येथे वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा बारावीमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, रात्री काही सहकारी ग्रामसेवक मित्रांसोबत फिरायला जाण्याचा त्यांचा बेत असल्याचेही समजते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट कंटेनरच्या मागील बाजूस घुसली. अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे दबला गेला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.


