मिरजेत गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष; सहा जणांना ३६ लाखांचा गंडा

0
WhatsApp Image 2026-05-24 at 8.15.38 PM

मिरज (प्रतिनिधी)

गुंतवणुकीवर तब्बल ४० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मिरजेत सहा जणांची तब्बल ३६ लाख ६८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

फारुख हिबजूरहिमान जमादार आणि सणोबर फारूक जमादार (रा. आशियाना ट्रेडर्सच्या मागे, मिरज) यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुनीर अहमदगौस मनेर (वय ४४, रा. मंगळवार पेठ, झारी मस्जिदजवळ, मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. मे ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे पोलिसांत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, आरोपींनी मिरज शहरातील सहा जणांकडून वेगवेगळ्या ठिकाणी तसेच ऑनलाईन पद्धतीने मोठी रक्कम उभी केली. गुंतवणुकीवर ४० टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत त्यांनी पैसे घेतले. मात्र गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपींकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

यानंतर आरोपींनी गुंतवणूकदारांना बँकेचे धनादेश दिले. मात्र संबंधित धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते बाउन्स झाल्याचे समोर आले. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *