मिरजेत आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त १ जूनला भव्य ऐतिहासिक कुस्ती मैदान
मिरज (प्रतिनिधी)
भाजपा प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारूक भैय्या जमादार यांच्या वतीने मिरजेचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, 1 जून रोजी भव्य आणि ऐतिहासिक कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरज शहरातील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हे भव्य मैदान रंगणार असून “न भूतो न भविष्यती” असे कुस्ती मैदान मिरजकरांना अनुभवायला मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. युवा उद्योजक फिरोज भाई जमादार, गणेश बागळी, उमेश हारगे, बंडू शेटे, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, गौस खाटीक (नाना) तसेच त्यांचे सहकारी याचे आयोजन करणार आहेत.
मैदानाची सुरुवात दु. ४ वा. होणार असली तरी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत १०० रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जाणार आहेत. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील तब्बल ८०० ते १००० मल्ल आणि कुस्तीप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या भव्य मैदानाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असून डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी किताब विजेते नामांकित मल्लही उपस्थित राहणार आहेत.
मैदानातील प्रमुख आकर्षण म्हणून पैलवान सिकंदर शेख विरुद्ध इराणचा इरफान यांच्यातील बहुचर्चित लढत रंगणार आहे. या ऐतिहासिक कुस्ती मैदानाचा लाभ सर्व कुस्तीप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन भाजपा प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारूक भैय्या जमादार यांनी केले आहे.


