मिरज हॉटेल असोसिएशनचा घरपट्टी वाढीला विरोध; महापौरांना निवेदन

0
IMG-20260525-WA0048

सांगली (प्रतिनिधी)
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेकडून नव्या पद्धतीने घरपट्टी आकारणीस सुरुवात करण्यात आली असून, वाढीव घरपट्टीच्या नोटिसा मालमत्ताधारकांना देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मिरज हॉटेल असोसिएशनच्या वतीने वाढीव घरपट्टीला विरोध दर्शवत महापौर धीरज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

नगरसेवक दयानंद खोत व केदार खाडिलकर यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महापौर सूर्यवंशी यांनी घरपट्टी वाढीच्या नोटिसांवर हरकत नोंदविण्याचे आवाहन करत अन्यायकारक वाढ होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच आवश्यक असल्यास संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असेही त्यांनी सांगितले.

निवेदनात हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे कि, कोविडनंतर हॉटेल व्यवसाय मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाढती स्पर्धा, धान्य, तेल, भाजीपाला, मजुरी, वीजदर आणि गॅस सिलेंडरच्या समस्येमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच महामार्ग शहराबाहेर गेल्याने प्रवासी ग्राहकांची संख्याही घटली आहे. महानगरपालिका ‘ड’ वर्गात असतानाही मालमत्ता कर इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. आतापर्यंत सर्व कर नियमितपणे भरले असून, सध्याच्या परिस्थितीत वाढीव घरपट्टी परवडणारी नाही. हॉटेल व्यवसायाला चालना देण्याऐवजी वाढीव कर आकारणी अन्यायकारक ठरेल, त्यामुळे हॉटेल, ढाबा, लॉज व रेस्टॉरंटवरील घरपट्टी वाढ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मिरज हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष नासिर शेख, सचिव ओंकार शुक्ल, अण्णा आचार्य, फिरोज जमादार, राकेश कोळेकर, सच्चानंद अहुजा, सहदेव कोरे, अमरजीतसिंग खंगुरा, इजाज बेपारी, यासिर सनदी, शोएब बेपारी, भूषण गोठणकर, समीर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *