पाणी प्रदूषणासह कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही ; ‘बळीराजा ॲग्रोटुरिझम’चा खुलासा
मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
मिरज तालुक्यातील मालगाव येथील ‘बळीराजा ॲग्रोटुरिझम’ प्रकल्पात कोणत्याही प्रकारचे पाणी प्रदूषण होत नसून कोणत्याही शासकीय नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले नाही, असा खुलासा प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेत केला. ‘बळीराजा ॲग्रोटुरिझम’चे संस्थापक अशोक तवटे, चेअरमन इंद्रजीत तवटे, निखिल अॅनालिटिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक खांबे सर तसेच अशोक पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
यावेळी बोलताना चेअरमन इंद्रजीत तवटे म्हणाले की, संबंधित घटनेच्या दिवशी काही ग्राहकांनी प्रथम कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. त्यानंतर स्वसंरक्षणाच्या भूमिकेतून सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केला. या प्रकरणात ग्राहकांनी आमच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, ग्राहकांच्या सुरक्षेबाबत आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. संबंधित घटनेनंतर सात सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मालगाव येथील ‘मिरज-मालगाव’ रस्त्यावरील या प्रकल्पास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावता प्रकल्प सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भात सात दिवसांत समाधानकारक खुलासा न दिल्यास प्रकल्प सील करून वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिला होता.
मात्र, प्रकल्प व्यवस्थापनाने हे सर्व आरोप फेटाळले असून कोणतेही पाणी प्रदूषण होत नसल्याचा दावा केला आहे. तसेच सर्व नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी प्रकल्पात प्राथमिक उपचार केंद्र, डॉक्टर व ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्विमिंग पूल, लाईफ गार्ड, स्लाईड ऑपरेटर तसेच पुरेसा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. सध्या या ठिकाणी सुमारे १३० कर्मचारी कार्यरत असून दररोज जवळपास दीड हजार पर्यटक ‘बळीराजा ॲग्रोटुरिझम’ला भेट देत असल्याची माहिती चेअरमन इंद्रजीत तवटे यांनी दिली.


