फार्म हाऊस संस्कृतीच्या आड रंगताहेत बेकायदेशीर पार्ट्या?
नियमावलीसह कारवाईची गरज
कोल्हापूर (प्रतिनिधी)
निसर्गरम्य वातावरण, शहरापासून दूर शांत परिसर आणि सर्व आधुनिक सुविधा यामुळे जिल्ह्यातील फार्महाऊसची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. विकेंड, वाढदिवस, मित्रांचे गेट-टुगेदर, कौटुंबिक समारंभ किंवा कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी फार्महाऊस बुक करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या वाढत्या संस्कृतीच्या आड काही ठिकाणी बेकायदेशीर पार्ट्या, अंमली पदार्थांचा वापर आणि अश्लील मनोरंजनाचे प्रकार सुरू असल्याची बाब समोर येत आहे. करवीर तालूक्याती तामगाव येथील एका फार्महाऊसवर बुधवारी रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या संपूर्ण प्रकाराकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड, आजरा तसेच करवीर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फार्महाऊस उभारण्यात आली आहेत. निसर्गाच्या सान्निध्यातील मुक्काम, स्विमिंग पूल, खेळांची सुविधा, भोजन आणि इतर सोयींमुळे केवळ कोल्हापूरच नव्हे, तर सांगली, बेळगाव आणि आसपासच्या भागातील पर्यटकही या फार्महाऊसना पसंती देत आहेत.
मात्र, या सुविधांचा गैरफायदा घेत काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पार्ट्यांमध्ये मद्यपान, अंमली पदार्थांचा वापर, मोठ्या आवाजातील डीजे आणि अश्लील नृत्याचे कार्यक्रम आयोजित होत असल्याची माहिती तपास यंत्रणांकडे येत आहे. विशेष म्हणजे, अनेक फार्महाऊस शहरापासून दूर आणि एकांत परिसरात असल्याने अशा कार्यक्रमांची माहिती प्रशासनापर्यंत उशिरा पोहोचते. खासगी मालमत्तेतील कार्यक्रमांवर कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने काहीजण याचाच गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.
तामगाव येथील कारवाईमुळे अशा प्रकारच्या पार्ट्यांचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फार्महाऊसवर अधिक प्रभावी देखरेख ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. फार्महाऊस सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, कार्यक्रमांची नोंद, ध्वनिप्रदूषण नियंत्रण आणि कायद्याचे पालन यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याची मागणीही जोर धरत आहे.
सोशल मीडियातून खुलेआम प्रमोशन
काही फार्महाऊस चालक सोशल मीडियावरील रिल्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करत आहेत. काही जाहिरातींमध्ये रात्रीच्या पार्टी, डीजे, मद्यपान आणि खास व्यवस्थेचा अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचे दिसून येते. अशा जाहिरातींची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता वावरतपास यंत्रणांच्या माहितीनुसार, काही सराईत गुन्हेगार अशा फार्महाऊसचा वापर बैठकांसाठी किंवा बेकायदेशीर व्यवहारांसाठी करत असल्याचा संशय आहे. अंमली पदार्थांची देवाणघेवाण, जुगार आणि इतर अवैध व्यवहारांसाठी काही ठिकाणांचा वापर होत असल्याने पोलिसांकडून अशा ठिकाणांवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
एजंटमार्फत पार्टींचे नियोजन
रंगीत-संगीत पार्ट्यांचे नियोजन करणारे काही एजंट कार्यरत आहेत. हे एजंट ग्राहकांच्या मागणीनुसार मद्य, डीजे, मनोरंजन आणि इतर व्यवस्था करून देत असल्याचा संशय आहे. या साखळीचा तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.


