सांगली-मिरज विधानसभा संपर्क प्रमुखपदी शिवसेनेकडून महादेव सावंत यांची नियुक्ती
मिरज (प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या मिरज व सांगली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी मिरज तालुक्यातील युवा नेते महादेव सावंत यांची नियुक्ती केली आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावंत यांना निवडीचे पत्र देण्यात आले. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व पूर्ण ताकतीने पार पडणार आहे. दोन्ही मतदारसंघांसह जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे महादेव सावंत यांनी सांगितले.
महादेव उर्फ निशिद सावंत यांनी आजपर्यंत मिरज तालुक्यात शिवसेनेचे संघटन वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. शिवसेनेचे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनहिताचे, सर्वांगिण विकासाचे जनताभिमुख निर्णय घरा घरापर्यंत पोहचवीणेसाठी परिश्रम घेतले आहेत. मिरज तालुका युवा सेना प्रमुख आणि सहकार सेनेच्या माध्यमातून संघटना बळकट करणेसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने काम केले आहे.
पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. दगडू दादाजी सपकाळ यांनी सांगली दौऱ्या दरम्यान सावंत यांच्या कामाची दखल घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महादेव उर्फ निशिद सावंत यांची सांगली व मिरज विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुखपदी निवड करण्याची विनंती केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विनंती मान्य करून तात्काळ पत्र देऊन सावंत यांची नियुक्ती केली. शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांनी दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडू. दोन्ही मतदारसंघांसह जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन दखलपात्र करुन दाखवू असा विश्वास महादेव उर्फ निशिद गोकुळ सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी…
महादेव सावंत यांनी यापूर्वी शिवसेनेत युवा सेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख, शिवउद्योग संघटना पश्चिम महाराष्ट्र संघटक, सहकार सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव आदी पदांवर पक्षात संघटनात्मक कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून त्यांची निवड करण्यात आली असल्याचे सावंत यांनी सांगितले. मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागातील पक्षाच्या निष्ठावंत युवा कार्यकर्त्याला या प्रमुख पदावर संधी दिल्याबद्दल शिवसेना कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


