तीन जिल्ह्यांची नोंद रिक्षा परवान्यावर कायम ठेवा – पृथ्वीराज पाटील

0
WhatsApp Image 2026-05-27 at 8.34.45 PM

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

सांगली (प्रतिनिधी)

सांगली, सातारा व कोल्हापूर कार्यक्षेत्रातील तीन आसनी प्रवासी रिक्षा परवान्यावर पूर्वीप्रमाणेच तीनही जिल्ह्यांची नोंद कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मंत्री सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना तपासून पुढील कार्यवाही करण्याचा आदेश दिला.

पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, सांगलीपासून अवघ्या चार किलोमीटरवर कोल्हापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते, तर कासेगावपासून तीन किलोमीटरवर सातारा जिल्हा व मिरज शहरापासून सात किलोमीटरवर कर्नाटक राज्य सुरू होते. मिरज ही आरोग्य पंढरी आहे. त्यामुळे दररोज तिन्ही जिल्ह्यांतील रुग्ण मिरजेत उपचारांसाठी परवडणाऱ्या तीन आसनी रिक्षाने जिल्हांतर्गत ये-जा करतात. तसेच तिन्ही जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी भाविक, तसेच छोटे व्यावसायिक व विद्यार्थीही जिल्हांतर्गत रिक्षानेच मोठ्या संख्येने ये-जा करतात. अलीकडे रिक्षा परवाना नोंदीत फक्त एका जिल्ह्याची नोंद असल्याने अन्य जिल्ह्यांतील वाहतूक पोलिस व आरटीओकडून रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पृथ्वीराज पाटील यांनी ही बाब परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी मंत्री सरनाईक यांनी लवकरच रिक्षा चालक आणि परिवहन प्रशासन यांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिल्याची माहिती भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *