शिकवणी वर्ग नियंत्रण कायदा करण्याची सांगलीतील क्लास चालकांची मागणी
सांगली (प्रतिनिधी)
येथील कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन व सोशल फोरमच्या वतीने नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिकवणी वर्ग नियंत्रित करणारा सशक्त व प्रभावी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली. चरितार्थासाठी प्रामाणिकपणे शिकवणी वर्ग चालवणाऱ्या क्लास चालकांच्या या संघटनेतर्फे निवासी जिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात वाढत चाललेल्या व्यापारीकरणाला आणि अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिकवणी वर्गांसाठी स्वतंत्र नियंत्रण कायदा लागू व्हावा यासाठी गेली पंधरा वर्षे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच पेपरफुटीसारखे गंभीर प्रकार घडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. नारायण उंटवाले, राज्य ज्येष्ठ सल्लागार रावसाहेब हल्लोले, राज्य समन्वयक संजय कुलकर्णी, प्रताप गस्ते, भीमराव धुळूबुळू, आर. बी. शिंदे, राघवेंद्र नाईक, विशाल मगदूम, बसवराज हिरेमठ, सचिव राजू पाटील, मकरंद उपळावीकर, सूर्यकांत तवटे, विनायक ढवळे, सुनील कुलकर्णी, विशाल लोहार आदी मान्यवर तसेच अनेक क्लास चालक उपस्थित होते.


