बेळंकी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 

0

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)

 मिरज तालुक्यातील बेळंकी व परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या १५ कोटी ५८ लाख खर्चाच्या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून, सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि विकासाभिमुख दृष्टीकोनातून साकार झालेल्या या महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पाचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 

कार्यक्रमास जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील,  सुमनताई खाडे, सुशांत खाडे, स्वातीताई खाडे, बाळासाहेब होनमोरे, सलगरेच्या सरपंच जयश्रीताई पाटील, लिंगनूरचे सरपंच मारुती पाटील, माजी सरपंच तानाजीराव पाटील, नगरसेवक गणेश माळी, निरंजन आवटी, संदीप आवटी, सभापती बानू मुसा जमादार नगरसेविका विद्या नलवडे, काकासाहेब धामणे, राजु माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

ग्रामीण भागात उभारलेल्या सुमारे ३८५५.८९ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक इमारतीमध्ये १२ ओपीडी कक्ष, एक्स-रे विभाग, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, रक्त साठवण सुविधा, मेडिकल स्टोअर, प्रसूती विभाग, नवजात शिशु विभाग, महिला व पुरुष वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम, अतिरिक्त वॉर्ड, पे वॉर्ड तसेच इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयामुळे बेळंकीसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या परिसरात उपलब्ध होणार असून, उपचारासाठी मिरज, सांगली किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

 विशेषतः माता व बाल आरोग्य सेवा, आपत्कालीन उपचार आणि शस्त्रक्रिया सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *