निपाणी येथील तवंदी घाटात धुंवाधार पाऊस ः वाहनचालकांची तारांबळ-हॉटेल अमरच्या कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी
निपाणी,ता.03(प्रतिनिधी)-

निपाणी शहरानजीक असलेल्या तवंदी घाटात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहात होते.तसेच डोंगरावरून लहान मोठे दगड पाण्यातून आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचे चित्र आज बुधवारी दुपारी घाट परिसरात दिसून आले.
मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे डोंगर भागातून रस्त्यावर येणारे पाणी आणि पाण्यातून येणारे लहान मोठे दगड यामुळे वाहनधारकांची तारांबळा उडाली.त्यामुळे नजीकच असलेल्या हॉटेल अमर मधील कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांची तारांबळ लक्षात घेऊन भर पावसात रस्त्यावरील दगड बाजूला करून वाहनधारकांना सहकार्य केले.
निपाणी परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाचे वातावरण तयार झाले होते.मात्र पावसाने हजेरी लावली नव्हती.मंगळवारी वाळकी याद्यानवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती.तर आज बुधवारी दुपारी तवंदी घाटात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
पावसामुळे तवंदी घाट डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे वाहताना दिसत होते.पाणी रस्त्यावरून येत असल्याने वाहनधारकांना वाहने सावकाश चालवावी लागत होती. डोंगरातून येणारे लाल मातीचे पाणी आणि त्यातून येणारे लहानमोठे दगड यामुळे वाहनधारकांना वाहने सावकाश चालवण्याबरोबरच पाण्यापासून लांब घेऊन वाहने रस्ता पार करावी लागत होती. या भागातील सर्वच परिसरात पाण्याचा मोठा लोंढा वाहताना दिसत होता.रस्त्याच्या मोठ्या चारीतून पाणी बाहेर पडून रस्त्यावरून वाहताना दिसत होते.डोंगर भागातून पाणी येत असल्याने चिखल मातीसह पाणी रस्त्यावरून वाहत होते.
हॉटेल अमरच्या कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी
तवंदी घाटमाथ्याच्या पायथ्याशी सदलगा येथील अमरजीत पाटील यांचे हॉटेल अमर गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या सेवेत आहे.ते नेहमी सामाजिक बांधिलकीतून काम करत असतात.अनेकवेळा लहान मोठे अपघात झाले असता रुग्णवाहिका व पोलिसांना माहिती देऊन जखमींना सहकार्य करण्याचे काम करीत आले आहेत.आजची परिस्थिती तशी गंभीरच होती.लाल मातीचे पाणी आणि त्यातून येणारे लहान मोठे दगड यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे हॉटेल अमरच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी भर पावसात रस्त्यावरील दगड व इतर वाहून येणारे साहित्य बाजूला करीत वाहनधारकांना सहकार्य केले.त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळत होता.तसेच हॉटेल अमरच्या कर्मचाऱ्याच्या सामाजिक बांधिलकीचे कौतूक होत आहे.


