तवंदी घाटाला पुन्हा पावसाने झोडपले वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

0

निपाणी,(प्रतिनिधी)-
निपाणी शहरानजीक असलेल्या तवंदी घाटाला आज दुसऱ्या दिवस पुन्हा जोरदार पावसाने झोडपले. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले होते. तर गव्हाणी फाट्यानजीक मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिल्याने वाहने चालविणे अवघड बनले होते. त्यामुळे घाट परिसरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
काल बुधवारी दुपारी झालेल्या पावसानंतर पुन्हा आज गुरूवारी दुपारी मोठ्या प्रमाणात पावसाने या परिसरात हजेरी लावली. डोंगर माथ्यावर जोरदार वृष्टी होत असल्याने खाली सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. त्यामुळे आजही महामार्गाला ओढ्याचे स्वरूप आले होते. त्यातच गवाणी फाट्याजवळ वाहून आलेले आणि उडाण पुलाचे पाणी एकत्रीत पडत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे वाहने सावकाश चालविली जात असल्याने वाहनांच्या रस्त्यावर रांगा लागल्याचे दिसून येत होते.
डोंगरी भागात पावसाची जोरदार हजेरी…
काल तंवदी घाटात तसेच वाळकी,यादनवाडी या भागात पावसाची जोरदार हजेरी लागली होती. आज पुन्हा तंवदीसह शेंडूर, पांगीरे या डोगर भागात जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे ओढा ओहाळांना मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. अनेक ठिकाणी शेताच्या कडा तोडून पाणी वाहत होते. जोरदार पावसाने शेतीला गरज असलेला पाऊस झाला असून यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
निपाणीतही हजेरी..
आज निपाणी शहराचा आठवडी बाजार असल्याने बाजारात मोठी गर्दी असते. मात्र बाजाराच्या गर्दीतच आज दुपारी पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे व्यापारी वर्गाची मोठी तारंबळा उडाली होती. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने भाजीपाला बाजूला घेवून व्यापार करावा लागत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा