भूसंपादनग्रस्तांना योग्य मोबदला द्या ः अन्यथा आमदारांविरोधात तीव्र आंदोलन

0
IMG-20260725-WA0060

शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सत्यप्पा मल्लापूरे यांचा इशारा

चिक्कोडी,ता.25(प्रतिनिधी)-
चिक्कोडी शहरातील सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य व वाढीव नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी येत्या 30 जुलै रोजी चिक्कोडीत भव्य विराट आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलन स्थळी चिक्कोडी-सदलगा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अन्यथा त्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सत्यप्पा मल्लापूरे यांनी दिला.ते चिक्कोडी येथील हालट्टी येथे आयोजित शेतकरी शालू दीक्षा कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, भूसंपादनामुळे अनेक शेतकरी आपल्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेली सुपीक जमीन गमावत आहेत. मात्र शासनाने निश्‍चित केलेली नुकसान भरपाई अत्यंत कमी असून सध्याच्या बाजार मूल्याच्या तुलनेत ती अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. त्यामुळे आमदार गणेश हुक्केरी यांनी या प्रश्‍नात तातडीने हस्तक्षेप करून शासनाकडून न्याय मोबदला मिळवून द्यावा. तसेच 30 जुलैच्या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकाव्यात. त्यांच्या मागण्यांबाबत शासनाशी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी मल्लापूरे यांनी केली. सदर आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
30 जुलै रोजी चिक्कोडीत भव्य विराट शेतकरी आंदोलन
30 जुलै रोजी चिक्कोडीत भव्य विराट शेतकरी आंदोलन होणार असून भूसंपादनग्रस्तांना वाढीव व न्याय नुकसान भरपाईची मागणी केली जाणार आहेत.तसेचआमदार गणेश हुक्केरी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा