प्रलंबित बिल मंजुरीसाठी ९५ हजारांची लाच; गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर गुन्हा

0
fc23ee1e-2dbd-46bb-ab82-39dea10ed7e6

मिरज (प्रतिनिधी)
गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी आणि लिपिकाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली पथकाने केली. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वर्षा शंकर कदम (वय ४०, रा. खटाव) आणि लिपिक शरद दत्तात्रय चौगुले (वय ४०, रा. सिद्धेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने गुंडेवाडी ग्रामपंचायतीस आवश्यक साहित्याचा पुरवठा केला होता. त्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सुरुवातीला १ लाख २८ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने १७ जून २०२६ रोजी सांगली येथील एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता, आरोपींनी तडजोडीनंतर लाचेची रक्कम कमी करत अखेर ९५ हजार रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे निष्पन्न झाले.

या निष्कर्षाच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतम चौगुले, विना जाधव, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, प्रकाश जाधव, सुदर्शन पाटील, मनोज निळकंठ व चालक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *